राहुल द्रविडच्या शिष्याची भारतीय संघात निवड

लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या जागी टीम इंडियात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. तर त्यापुढील न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलची वर्णी लागली आहे. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली शुबमनने विजयी चषक उंचावला होता. कोण आहे शुबमन, जाणून घेऊया...

शुबमन गिलचा जन्म 8 फेब्रुवारी 1999 सालचा. 2017 मध्ये शुभमनने पंजाब संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.बंगाल विरुद्धच्या या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तसेच पुढच्याच सामन्यात 129 धावांची खेळी केली.

विजय मर्चंट ट्रॉफीमध्येही 16 वर्षांखालील पंजाब संघाकडून पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक केले होते.

2013-14 आणि 2014-15 मध्ये बीसीसीआयचा सर्वोत्तम ज्यूनियर क्रिकेटपटूचा पुरस्कारही त्याने जिंकला.

2018 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत शुबमनने 372 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्याने 2014 मध्ये 16 वर्षांखालील पंजाब आंतरजिल्हा स्पर्धेत 351 धावांची खेळी केली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 सामन्यात 1089 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 36 सामन्यात 1529 धावा केल्या आहेत.

रणजी करंडक स्पर्धेत त्याने 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. त्यात तमिळनाडूविरुद्ध केलेल्या 268 धावांच्या खेळीचा विशेष उल्लेख करावा लागेल.

आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाने 1.80 कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात दाखल करून घेतले.