शेवटच्या चेंडूवर कार्तिकने मारला षटकार, भारताने जिंकला चषक

अंतिम सामन्यात कार्तिकच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताने विजेतेपदाचा करंडक उचलला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.

अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरच्या ३ षटकात भारताला ३५ धावांची गरज असताना युवा अष्टपैलू विजय शंकर दडपणाखाली ढेपाळला. पण कार्तिकने फटकेबाजी करत सामाना एकहाती फिरवला.

चहलने ३ तर उनाडकटने २ बळी मिळवत चांगला मारा केला.

कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला थरारक विजय मिळवून दिल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंना आपली निराशा लपवता आली नाही.

अखेरच्या २ षटकात विजयासाठी ३४ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ ८ चेंडूत नाबाद २९ धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध ४ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या फायनलमध्ये कार्तिकने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कार्तिकने १९ व्या षटकात तब्बल २३ धावांची बरसात करत एकवेळ अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. २ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करणाऱ्या कार्तिकने नागोबांना ठेचले अशी प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमीमध्ये उटत आहे.