आयपीएलमधील 'हे' स्टार बिघडवणार विराटचे ग्रहमान?

इंडियन प्रीमिअर लीगमधील आपापली जबाबदारी पार पाडून परदेशी खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशात रवाना झाले. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे हे परदेशी खेळाडू आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरू शकतील. कोण आहेत हे स्टार?

इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने आपल्या दमदार खेळीचे श्रेय आयपीएलला दिले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 359 धावांचे लक्ष्य सहज पार केले. आयपीएलमध्येही त्याने 10 सामन्यांत 445 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्सचा पोस्टर बॉय बनला आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही आघाडींवर त्याने आपला प्रभाव पाडला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

इंग्लंडचा जोस बटलर हाही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याने 8 सामन्यात 311 धावा केल्या आहेत.

इम्रान ताहीरने आपल्या फिरकीच्या तालावर प्रतिस्पर्धींना नाचवले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक 25 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

कागिसो रबाडा... दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने आयपीएलमध्ये आपल्या जलद माऱ्याने धुमाकुळ घातला. दुखापतीमुळे त्याला माघारी जावे लागले.

हैदराबाद सनरायझर्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने यंदांचा हंगाम गाजवला. बॉल टॅम्परिंग प्रकरणात एक वर्षाच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरने या स्पर्धेत सर्वाधिक 692 धावा चोपून ऑरेंज कॅप नावावर केली. आता तो ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघातही परतला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी'कॉकनेही मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 14 सामन्यांत 529 धावा केल्या.

वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये काय धुमाकूळ घातला, हे वेगळे सांगायला नको. त्याच्या भरवशावर कोलकाता नाईट रायडर्सने प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या, परंतु एकटा खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. रसेलने 204.81च्या स्ट्राईक रेटने 510 धावा केल्या.

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची बॅट यंदा फार तळपली नसली तरी त्याने 490 धावा केल्या आहेत. आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंड मालिकेत गेलने चार सामन्यांत 400+ धावा चोपल्या होत्या.