IPL Auction 2018 : यंदा या 10 भारतीय खेळाडूंना लागली 'लॉटरी', झाले 'मालामाल'

जयदेव उनाडकट - गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा जयदेव उनाडकट हा मध्यमगती गोलंदाज यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं तब्बल ११ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतलं आहे. गेल्या वर्षी रायझिंग पुणे सुपरजायंट्सने जयदेवला ३० लाख रुपयांमध्ये - अर्थात त्याच्या बेस प्राइसला खरेदी केलं होतं.

लोकेश राहुल - कसोटी क्रिकेटपटूचा ठपका असलेला भारताचा सलामीवीर लोकश राहुलला आयपीएल 2018 लिलावात मोठी किंमत मिळाली आहे. 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या राहुलचा भाव वाढत जाऊन 11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 11 कोटी रुपयांना विकत घेतले.

मनिष पांडे - गेल्यावर्षी कोलकाता संघाकडून चमकदार कामगिरी करणार्या मनिष पांडेला हैदराबादनं 11 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. मधल्या फळीत चमकदार कामगिरी कऱण्याची शमता असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई, पंजाब आणि हैदराबादमध्ये चांगलीच चुरस झाली. पण शेवटी हैदराबादनं त्याला 11 कोटींमध्ये खरेदी केलं.

कृणाल पांड्या - मुंबई इंडियंसने कृणाल पांड्याला 8.8 कोटींमध्ये खरेदी केलं. कृणालसाठी मुंबईनं इंडियन्सनं राइट टू मॅच कार्डचा वापर केला. गेल्यावर्षी आपल्या अष्टपैलू कामगिरीनं विजयात त्यानं महत्वपुर्ण भूमिका बजावली होती.

संजू सॅमसन - या यूवा खेळाडूला यावर्षी लॉटरी लागली असेच म्हणावे लागेल. संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सनी 8 कोटींना खरेदी केलं... भारतीय विकेटकिपरला यावर्षी चांगलीच बोली लागली. संजूनं राजस्थानकडून खेळताना निर्णायक पारी खेळत संघाला विजय मिळून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी तो दिल्लीच्या संघाकडून खेळत होता.

केदार जाधव - कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा भरवशाचा खेळाडू महाराष्ट्राचा केदार जाधव या चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील झाला आहे. फलंदाज, ऑफ स्पिनर आणि पर्यायी यष्टिरक्षक या त्याच्या क्षमतेवर सीएसकेने त्याला ७ कोटी ८० लाख रुपयात विकत घेतले आहे. अष्टपैलू कौशल्य असलेल्या केदारची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.

रविचंद्रन अश्विन - भारतीय संघातील अनुभवी अश्विनसाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी पंजाबनं मात करत अश्विनला खरेदी केलं. अश्विनसाठी पंजाबनं 7.6 कोटी रुपयांची बोली लावली. यापूर्वी अश्विने पुणे आणि चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

दिनेश कार्तिक - स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत दिर्घकाळानंतर भारतीय संघात परतलेल्या कार्तिकला यावर्षी लॉटरी लागली आहे. विकेटकिपर आणि मधल्या फळीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या अनुभवी कार्तिकाला 7.4 कोटी रुपयांत कोलकातानं खरेदी केलं आहे.

रॉबिन उथप्पा - मुंबईने 6 कोटी 40 लाखांची बोली लावल्यानंतर कोलकात्यानं रॉबिन उथप्पासाठी 'राइट टू मॅच' कार्डचा वापर करत आपल्याकडेच ठेवलं. गेल्यावर्षी काही वर्षात त्यानं कोलकाताच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली होती. एक आक्रमक सलामिवीर आणि विकेटकिपर असलेल्या उथप्पाला कोलकातानं खरेदी केलं.

कृष्णप्पा गौतम - कर्नाटकच्या कृष्णप्पा गौतम या ऑफ स्पिनरला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्सनं बेस प्राइसपेक्षा तब्बल ६ कोटी रुपये जास्त मोजले. २०१७च्या आयपीएल स्पर्धेत कृष्णप्पा गौतम मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यावेळी मुंबईनं त्याच्यावर २ कोटींची बोली लावली होती. परंतु, यावर्षी त्याला आणखी मोठ्ठी लॉटरी लागलीय. कृष्णप्पाचा लिलाव सुरू झाला, तो २० लाखांच्या बेस प्राइसपासून. त्यानंतर, ही रक्कम वाढत वाढत ६ कोटी २० लाखांवर पोहोचली. शेवटची बोली राजस्थानची असल्यानं कृष्णप्पानं 'रॉयल' संघात थाटात प्रवेश केला.