रोहित शर्माचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम सॅम कुरनने मोडला

मोहाली, आयपीएल 2019 : रिषभ पंत ( 39) आणि कॉलीन इंग्राम ( 38) यांच्या 62 धावांच्या भागीदारीनंतरही दिल्ली कॅपिटल्सला सामना गमवावा लागला. 21 चेंडूंत 24 धावांची गरज असताना दिल्लीचे सात फलंदाज शिल्लक होते, परंतु तरीही किंग्स इलेव्हन पंजाबने 14 धावांनी सामना जिंकला. दिल्लीचे 7 फलंदाज अवघ्या 17 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतले. मोहम्मद शमी ( 2/27) आणि सॅम कुरन ( 4/11) यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा केला. कर्णधार रवीचंद्रन अश्विन यानेही दोन विकेट घेतल्या. पण, कुरनने घेतलेली हॅटट्रिक या सामन्यात चर्चेचा विषय ठरली.

आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा कुरन हा 16 वा गोलंदाज ठरला, तर किंग्स इलेव्हन पंजाबचा तिसरा... यापूर्वी पंजाबकडून युवराज सिंग ( दोन वेळा 2009) आणि अक्षर पटेल ( 2016) यांनी ही कामगिरी केली आहे.

तीनही फलंदाजांना भोपळाही फोडू न देता हॅटट्रिक साजरा करणारा कुरन हा तिसरा गोलंदाज ठरला. याआधी अमित मिश्रा ( सनरायझर्स हैदराबाद वि. पुणे वॉरियर्स इंडिया 2013 ) आणि प्रविण तांबे ( राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स 2014) यांनी अशी कामगिरी केली आहे.

आयपीएलच्या एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी आणि हॅटट्रिक हा योगायोग दहा वर्षांनी जुळून आला. सॅन कुरनने सोमवारच्या सामन्यात सलामीला फलंदाजी केली आणि हॅटट्रिक केली. याआधी युवराज सिंगने 2009 मध्ये पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध असा पराक्रम केला होता.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कुरनने 2.2 षटकांत 11 धावा देत 4 फलंदाज बाद केले. आयपीएलमधील पंजाबच्या गोलंदाजाने नोंदवलेली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या क्रमवारीत अंकित रजपूत ( 5/14 वि. सनरायझर्स हैदराबाद, 2018) आणि मास्केरेन्हास ( 5/25 वि. पुणे वॉरियर्स इंडिया, 2012) हे आघाडीवर आहेत.

3 बाद 144 धावांवरून दिल्ली कॅपिटल्सचा संघ 152 धावांत तंबूत परतला. आयपीएल इतिहासात सात विकेट 8 धावांत आणि 17 चेंडूत पडण्याची ही पहिलीच आणि लाजीरवाणी घटना आहे.

दिल्लीचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. आयपीएलमधील ही दुसरी लाजीरवाणी कामगिरी ठरली. दिल्लीच्या पृथ्वी शॉ, ख्रिस मॉरिस, हर्षल पटेल, कागिसो रबाडा व संदीप लामिछाने हे शून्यावर बाद झाले. याआधी कोची टस्कर्सचे सहा फलंदाज डेक्कन चार्जर्सविरुद्ध भोपळा न फोडता माघारी परतले होते.

20 वर्ष व 302 दिवसांचा सॅम कुरन हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये हॅटट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला. कुरनने रोहित शर्माचा विक्रम मोडला. 2009 मध्ये रोहितने 22 वर्ष व 6 दिवसांचा असताना हॅटट्रिक घेतली होती.