IPL 2019 : मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असेल नजर

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. घरच्या मैदानावर विजयी सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी सज्ज आहे. आयपीएलचे जेतेपद तीनवेळा पटकावणाऱ्या मुंबईचे पारडे जड आहे. पण, या सामन्यात पाच खेळाडूंच्या कामगिरीवर अधिक लक्ष असणार आहे.

रिषभ पंत : गत मोसमात रिषभ पंतने दमदार कामगिरी केली होती. त्याने 14 सामन्यांत 684 धावा चोपल्या होत्या आणि त्यात 5 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश होता. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून पंत याही मोसमात धमाकेदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

रोहित शर्मा : मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आघाडीवर आहे. आयपीएलच्या या मोसमात तो सलामीला येणार आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून चौकार-षटकारांच्या आतषबाजीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर ट्वेंटी-20 लीगमध्ये रोहित फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे.

जसप्रीत बुमराह : आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह ओळखला जातो. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची संपूर्ण धुरा बुमराहच्या खांद्यावर आहे. मागील सत्रात सुरुवातीला बुमराहला चांगली कामगिरी करता आली नव्हती, परंतु नंतर त्यानं लय मिळवली. त्यानं 14 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या.

हार्दिक पांड्या : कॉफी विथ करण कार्यक्रमातील वादग्रस्त विधान आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कामगिरीनंतर हार्दिक पांड्यात प्रचंड बदल झालेला पाहायला मिळाला. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेणारा पांड्या आयपीएलसाठी पूर्णपणे तंदुरूस्त झाला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यापूर्वी त्याला आयपीएलमधून लय मिळवण्याची संधी आहे.

शिखर धवन : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन यंदा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्समधून खेळणार आहे आणि दिल्लीला पहिले जेतेपद जिंकून देण्याचा निर्धार त्यानं व्यक्त केला आहे. गतवर्षी सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना त्याने 16 सामन्यांत 497 धावा केल्या होत्या, तर 2016 मध्ये त्याने हैदराबादला जेतेपदही जिंकून दिले होते.