IPL 2019 : कॅप्टन कोहलीचा जेतेपदाचा दुष्काळ संपणार, हे अकरा शिलेदार चषक आणणार!

चेन्नई, आयपीएल 2019 : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूला एकदाही इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल 2019) जेतेपद पटकावता आलेले नाही. पण, आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कोहली यंदा आयपीएलमध्येही धमाका करण्यासाठी सज्ज आहे. एबी डिव्हिलियर्स आणि सिमरोन हेटमेयर ही जोडी कोहलीसह फटकेबाजी करण्यासाठी आतुर आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूला सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे आणि त्यांच्या आयपीएल जेतेपदाच्या शर्यताचाही आज आरंभ होणार आहे. बंगळुरूचे हे अकरा शिलेदार कॅप्टन कोहलीला आयपीएल चषकाची भेट देण्यासाठी आतुर आहेत.

विराट कोहली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 2008च्या आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघासोबत आहे. आरसीबीकडून कोहलीनं सातत्यानं धावा केल्या आहेत आणि चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहलीच्या फलंदाजीवरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

पार्थिव पटेल : डावखुऱ्या यष्टिरक्षक फलंदाजांने आरसीबीसाठी आघाडीच्या फळीत दमदार फलंदाजी केली आहे. पॉवरप्लेमध्ये पटेलच्या खांद्यावर अधिक जबाबदारी असते.

एबी डिव्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सला '360' म्हणून ओळखले जाते. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात खुबीनं फटकेबाजी करण्यात एबी तरबेज आहे आणि त्यामुळेच कोहलीचा तो ट्रम्प कार्ड आहे. नुकत्याच पार पडलेल्या मजानसी चषक ट्वेंटी-20 स्पर्धेत त्यानं 162.06च्या स्ट्राईक रेटनं 282 धावा चोपल्या आहेत.

शिमरोन हेटमायर : प्रथमच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत आणि T10 लीगमध्ये हेटमायरची बॅट चांगलीच तळपली होती.

कॉलिन डि ग्रँडहोम : न्यूझीलंडच्या कॉलिन डी ग्रँडहोमला चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसच्या जागी संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. मार्कस सध्या युएई येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य आहे.

शिवम दुबे : मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आयपीएलमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आरसीबीनं त्याच्यासाठी 5 कोटी रुपये मोजले. रणजी करंडक स्पर्धेत शिवमने दमदार कामगिरी केली आहे.

वॉशिंग्टन सुंदर : गतवर्षी वॉशिंग्टन सुंदरला आरसीबीसाठी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, या युवा अष्टपैलू खेळाडूला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी संधी मिळू शकते.

नॅथन कोल्टर नायल : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कोल्टर नायलला भारताविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत फार चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहता आरसीबी त्याला आज खेळवू शकते.

उमेश यादव : रणजी करंडक स्पर्धेत आपल्या भेदक माऱ्यानं विदर्भ संघाला जेतेपद जिंकून देणारा उमेश यादव हा आरसीबीचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून रणजी स्पर्धेतील कामगिरीच्या पुनरावृत्तीची संघाला अपेक्षा आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप स्पर्धेत स्थान मिळवण्याचे त्याचे ध्येय आहे.

युजवेंद्र चहल : भारतीय संघातील प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल हा आरसीबीचा हुकूमी एक्का आहे. त्याने 23.56 च्या सरासरीनं आयपीएलमध्ये 82 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद सिराज : आरसीबीकडे मोहम्मद सिराजच्या रुपाने जलदगती गोलंदाजाचा सक्षम पर्याय आहे.