IPL 2019 : मुंबईनं परंपरा कायम राखली, दिल्लीनं विक्रमाला गवसणी घातली

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 2013पासून सुरू असलेली परंपरा रविवारीही कायम राखली. 2013पासून मुंबईला सलामीच्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 2019च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 37 धावांनी विजय मिळवत मुंबईची पराभवाची परंपरा कायम राखण्यात हातभार लावला. या विजयासह मुंबईला सर्वाधिक 12वेळा पराभूत करण्याचा विक्रमही दिल्लीनं नावावर केला.

रिषभ पंतच्या 27 चेंडूंत 78 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 213 धावांचा डोंगर उभा केला. त्याला शिखर धवन ( 43) आणि कॉलिन इंग्राम ( 47) यांची तोलामोलाची साथ लाभली.

रिषभ पंतने 7 षटकार आणि तितक्याच चौकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

आयपीएलमध्ये दिल्लीकडून सर्वात जलद अर्धशतकांच्या विक्रमात रिषभ पंतने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याने 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या विक्रमात ख्रिस मॉरिस ( 17 चेंडू) आघाडीवर आहे.

दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 12 वेळा नमवण्याचा पराक्रम केला. दिल्लीनं 23 सामन्यांत 12 विजय मिळवले, तर 11 वेळा पराभव पत्करला. या आकडेवारीत चेन्नई सुपर किंग्स ( 11) दुसऱ्या स्थानावर आहे.

214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला साजेशी सुरुवात करता आली नाही. रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक हे सलामीवीर 37 धावांवर माघारी फिरले.

सूर्यकुमार यादव ( 2) , हार्दिक पांड्या (0), बेन कटींग ( 3) यांना अपयश आले. किरॉन पोलार्ड (21) यालाही मोठी खेळी करता आली नाही.

पण, मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या युवराज सिंगने 53 धावांची खेळी केली, त्याला कृणाल पांड्याने 32 धावा करताना साथ दिली, परंतु दोघेही मुंबईचा पराभव टाळू शकले नाही.

हा सामना पाहण्यासाठी युवीची पत्नी हेझल किच, रोहित पत्नी आणि कन्या रितिका व समायरा आणि झहीर खानची पत्नी सागरिका याही उपस्थित होत्या.