प्रेरणादायी! पाणीपुरी विकून तो बनला क्रिकेटपटू

भारतीय वरिष्ठ संघापाठोपाठ युवा क्रिकेट संघानेही आशिया चषक उंचावला. बांगलादेश येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा ( 19 वर्षांखालील) आशिया चषक स्पर्धेत भारताच्या युवा शिलेदारांनी जेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम सामन्यात 3 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यात मुंबईच्या यशस्वी जैस्वालच्या 113 चेंडूंत 85 धावांच्या खेळीचा समावेश होता.

संपूर्ण स्पर्धेत यशस्वीने 79.50 च्या सरासरीने 318 धावा चोपल्या. 17 वर्षांच्या या खेळाडूला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध केलेल्या नाबाद 114 धावांच्या खेळीनंतर तो प्रकाशझोतात आला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 19 वर्षांखालील मालिकेत श्रीलंकेवर 3-2 असा विजय मिळवला होता.

त्याचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी दावा केला आहे की, यशस्वीने मागील तीन वर्षांत 51 शतके झळकावली आहेत आणि फिरकी गोलंदाजीने 300 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे अशीच कामगिरी केल्यास त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशच्या भदोही गावातील या युवा क्रिकेटपटूचा 19 वर्षांखालील भारतीय संघापर्यंतचा प्रवास खडतर होता. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी 2012 मध्ये तो अवघ्या 11व्या वर्षी मुंबईत त्याच्या काकांकडे आला. काकांचे घर लहान असल्यामुळे त्याला एका डेअरी दुकानात झोपावे लागायचे.

क्रिकेटचा सराव केल्यानंतर तो थकायचा... एक दिवस त्या दुकानदाराने यशस्वीचे सर्व सामान बाहेर फेकले. त्यानंतर काकांच्या विनंतीनंतर त्याला आझाद मैदानालगतच्या मुस्लिम युनायटेड क्लबच्या टेंटमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली. यादरम्यान त्याला आपला खर्च चालवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की,''मुंबईकडूनच क्रिकेट खेळण्याच्या निर्धाराने मी येथे दाखल झालो. एका टेंट मध्ये मी राहत होतो. त्यात ना वीज होती, ना पाण्याची सोय... दोन वेळेच्या जेवणासाठी मी फळ विक्रेत्याकडे काम केले आणि रात्री पाणीपुरी विकली. हे करताना अनेकदा सोबत खेळणारे खेळाडू पाणीपुरी खायला यायचे, तेव्हा खूप वाईट वाटायचे. मात्र हे काम करणेही माझ्यासाठी गरजेचे होते. ''

त्यानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखली. ज्वाला सिंग यांनी सांगितले की,'' 11-12 वर्षांचा असताना त्याची मी फलंदाजी पाहिली. आपल्यापेक्षा वरिष्ठ गोलंदाजांचाही तो मोठ्या खुबीने सामना करत होता. त्याच्या या कौशल्यानेच मला प्रभावित केले."

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यशस्वीच्या नावाची नोंद आहे. त्याने 14 वर्षांखालील एका सामन्यात नाबाद 319 धावा केल्या होत्या आणि 13 विकेट्सही घेतल्या होत्या. गाईल्स शिल्ड स्पर्धेत राजा शिवाजी विद्यामंदिर संघाविरुद्घच्या या खेळीने त्याला मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवून दिले. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करून त्याने भारताच्या 19 वर्षांखालील संघातही स्थान पटकावले आहे.