India vs Pakistan : भारताचा क्लिन स्विप ; पाकिस्तानला सातव्यांदा लोळवले!

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयी परंपरा कायम राखली.

भारताने रविवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला.

हिटमॅन रोहित शर्माच्या दमदार १४० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ३३६ धावांचा डोंगर उभा केला.

शिखर धवनच्या अनुपस्थितील सलामीला आलेल्या लोकेश राहुलनेही ५७ धावांची खेळी केली.

रोहित व राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची विक्रमी भागीदारी केली.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

कॅप्टन विराट कोहलीनेही ७७ धावांची जलद खेळी करत भीमपराक्रम नावावर केला.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११००० धावा करण्याचा विक्रम त्याने केला. त्याने २२२ डावांत हा पराक्रम केला.

धावांचा पाठलाग करताना पाचव्या षटकात विजय शंकरने पाकिस्तानला धक्का दिला.

फखर जमान व बाबर आजम यांनी शतकी भागीदारी करून पाकच्या आशा पल्लवीत केल्या.

कुलदीप यादवने या दोघांनाही माघारी पाठवून सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला.

त्यानंतर भारतीय गोलंदाज व पावसाच्या माऱ्याने पाकिस्तानला बेहाल केले.

पावसामुळे पाकिस्तानसमोर ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते.

पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ६ बाद २१२ धावा करता आल्या.

डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला.