ऑस्ट्रेलियाशी भिडणार भारताचे 'हे' शिलेदार; पाहू या, कोण आहे सगळ्यात दमदार!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी 12 जणांचा भारतीय चमू मंगळवारी जाहीर करण्यात आला. अॅडलेड ओव्हल येथे गुरुवारपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर टाकलेली नजर...

कर्णधार विराट कोहलीकडून या दौऱ्यात बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याने येथे 8 कसोटीत 62 च्या सरासरीने 992 धावा केल्या आहेत, त्यात 5 शतकं व 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सराव सामन्यात सूर गवसला खरा, परंतु प्रत्यक्ष मालिकेत त्याची कामगिरी कशी होते याची उत्सुकता आहे. त्याने येथे 4 सामन्यांत 57 च्या सरासरीने 1 शतक व 2 अर्धशतकांसह 399 धावा केल्या आहेत.

लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार की नाही, हे उद्याच कळेल. मात्र, येथे त्याने 2 सामन्यांत 32.50 च्या सरासरीने ( 1 शतक) 130 धावा केल्या आहेत.

सराव सामन्यात खणखणीत शतक झळकावणाऱ्या मुरली विजयला सातत्यपूर्ण खेळ करताना सलामीची धुरा सांभाळायची आहे. त्याने येथे 4 सामन्यांत 60.25च्या सरासरीने 482 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

मधल्या फळीतील भक्कम आधार असलेल्या चेतेश्वर पुजाराने येथे 3 सामन्यांत 201 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर केवळ एक अर्धशतक आहे.

रोहित शर्मा कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियात त्याची बॅट फार तळपली नाही. त्याने 3 सामन्यांत 28.83च्या सरासरीने (1 अर्धशतक) 173 धावा केल्या आहेत.

हनुमा विहारी ऑस्ट्रेलियात प्रथमच खेळणार आहे. पण, रोहितला स्थान मिळाल्यास त्याला बाकावर बसूनच हा सामना पाहावा लागेल.

रिषभ पंतने इंग्लंड दौऱ्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली होती, परंतु तो ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी खेळणार आहे.

आर अश्विन या एकमेव फिरकीपटूचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. अश्विनने 6 सामन्यांत 21 विकेट घेतल्या आहेत.

मोहम्मद शमीचा फॉर्म पाहता त्याच्याकडून अपेक्षा आहेत. येथे त्याने 3 सामन्यांत 15 विकेट घेतल्या आहेत.

इशांत शर्माला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. त्याने येते 10 सामन्यांत 20 विकेट घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमरा प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळणार आहे.