भारताचे 'हे' शिलेदार 8 वर्षांचा वर्ल्ड कप दुष्काळ संपवणार!

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघालाच जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघाने 1983 साली कपिल देव यांच्या, तर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर 2015च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पण, यंदा वर्ल्ड कप भारताचाच असा विश्वास चाहत्यांना आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपमध्ये 'हे' शिलेदार भारताचा 8 वर्षांचा दुष्काळ संपवतील, असा विश्वास वाढला आहे.

रोहित शर्मा व शिखर धवन ही जोडी आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम सलामीची जोडी आहे. रोहित शर्माने वर्षभरात 25 सामन्यांत 68.75च्या सरासरीने 1375 धावा केल्या आहेत आणि त्यात सहा शतकांचा समावेश आहे. धवननेही 25 सामन्यांत 3 शतकांसह 1121 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 48.73 इतकी आहे. इंग्लंडमध्ये 2013 व 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत या जोडीने दमदार फटकेबाजी केली आहे.

तिसऱ्या क्रमांकासाठी कर्णधार विराट कोहली याच्याशिवाय पर्याय असूच शकत नाही. 20 सामन्यांत त्याने 100.20 च्या सरासरीने 1503 धावा चोपल्या आहेत आणि त्यात 7 शतकांचा समावेश आहे. कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा विक्रम नावावर केला.

चौथ्या क्रमांकासाठी संघात चुरस आहे, परंतु कॅप्टन कोहलीची अंबाती रायुडूला पसंती आहे. रायुडूनेही सातत्यपूर्ण कामगिरी करताना संघातील स्थान टिकवले आहे. त्याने 15 सामन्यांत 51 च्या सरासरीने 459 धावा केल्या आहेत. परिस्थितीनुसार खेळ करण्याची खुबी तो जाणून आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशिवाय हा संघ पूर्ण होऊच शकत नाही. पाचव्या क्रमांकावर धोनीचा उत्तम पर्याय आहे. त्याचा अनुभव हा संघाला किती कामी येतो, हे सर्वांना माहित आहे. त्याशिवाय त्याला गवसलेला सूर हा संघात चैतन्य निर्माण करणारा आहे.

सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्या व केदार जाधव यांचे संघात असणे महत्त्वाचे आहे. दोघेही तडाखेबाज फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून देऊ शकतात. त्याशिवाय दोघांचे संघात असल्याने अतिरिक्त गोलंदाजांची उणीवही भरून निघेल.

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंच्या गोलंदाजीचा अंदाज बांधणे भल्या भल्या फलंदाजांना जमले नाही. या दोघांनी आशिया खंडाबाहेरही आपल्या फिरकीच्या तालावर प्रतिस्पर्धींना नाचवले आहे. गेल्या वर्षभरात कुलदीपने 24 सामन्यांत 55,तर चहलने 21 सामन्यांत 41 विकेट घेतल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांचा जलद मारा सुरुवातीच्या षटकांतच प्रतिस्पर्धी संघाला शरणागती मानण्यास भाग पाडतो. त्यानंतर उरलेली कसर भारतीय फिरकीपटू सहज भरून काढतात. भुवीने 23 आणि बुमराने 22 विकेट घेतल्या आहेत.

राखीव खेळाडू म्हणून संघात दिनेश कार्तिक किंवा मोहम्मद शमी यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण, कार्तिकचे पारडे जड आहे.