ICC World Cup 2019 : लसिथ मलिंगाचे अर्धशतक, बनला चौथा यशस्वी गोलंदाज

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. त्यानं इंग्लंडचा महत्त्वाचा फलंदाज जो रुटला बाद करून वर्ल्ड कप स्पर्धेतील विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. त्यानं या विक्रमासह सहकारी चामिंडा वासचा 49 विकेट्सचा विक्रम मोडला.

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात अधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 39 सामन्यांत 71 विकेट्स आहेत.

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 39 सामन्यांत 68 विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानचा वासीम अक्रम या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 36 सामन्यांत 55 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंकेचा लसिथ मलिंगाने या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान पटकावले. त्याने 25 सामन्यांत अर्धशतकी पल्ला ओलांडला आहे.