ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नर- अ‍ॅरोन फिंच जोडी एक नंबर; इंग्लंडविरुद्ध नोंदवले अनेक विक्रम!

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडूनही हार पत्करावी लागली. या पराभवामुळे इंग्लंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. अ‍ॅरोन फिंचचे खणखणीत शतक आणि त्याला डेव्हीड वॉर्नर ( 53), स्टीव्हन स्मिथ ( 38) व अ‍ॅलेक्स केरी ( 38) यांची साथ लाभली. एका वेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 350 धावा सहज कुटतील असे वाटत होते, परंतु इंग्लंडने त्यांना 285 धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले.

पण जेसन बेहरेनड्रॉफनं इंग्लंडच्या स्वप्नांना सुरूंग लावला. त्यानं 44 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याल साथ मिळाली ती मिचेल स्टार्कची. त्यानंही 43 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स इंग्लंडला विजय मिळवून देईल असे वाटत होते, परंतु स्टार्कच्या अप्रतिम यॉर्करने त्याचा त्रिफळा उडवला आणि लॉर्ड्सवर स्मशान शांतता पसरली. इंग्लंडच्या उरलेल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यांचा संपूर्ण संघ 221 धावांत तंबूत परतला.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 500 धावा करणारा डेव्हिड वॉर्नर पहिला फलंदाज ठरला. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पाचवा सलामीवीर फलंदाज आहे. भारताच्या सचिन तेंडुलकरने ( 1996 व 2003) दोनवेळा असा पराक्रम केला आहे. तेंडुलकरसह मॅथ्यू हेडन ( 2007), तिलकरत्ने दिलशान ( 2011) आणि मार्टिन गुप्तील ( 2015) यांनी ही कामगिरी केली आहे.

एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50+ धावांची भागीदारी करण्याचा पराक्रम डेव्हिड वॉर्नर आणि फिंच या जोडीनं केला. फिंच-वॉर्नर यांनी यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहावेळा अशी कामगिरी केली आहे. 2007च्या वर्ल्ड कपमध्ये अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांनी 7 वेळा 50+ भागीदारी केली आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारीचा विक्रमही फिंच व वॉर्नर यांनी केली आहे. या जोडीनं तीनवेळा शतकी भागीदारी केली असून अशी कामगिरी चौथी जोडी ठरली आहे. यापुर्वी अरविंद डीसिल्वा व गुरसिन्हा ( 1996), गिलख्रिस्ट व हेडन ( 2007), तिलकरत्ने दिलशान व कुमार संगकारा ( 2015) यांनी तीन शतकी भागीदारी केल्या आहेत.

एकाच संघाविरुद्घ सर्वाधिक शतक करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा विक्रमही फिंचने काल नावावर केला. इंग्लंडविरुद्ध त्याचे हे सातवे शतक होते आणि त्याने भारताविरुद्ध 6 शतकं लगावणाऱ्या अॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडला. रिकी पाँटिंगनेही न्यूझीलंडविरुद्ध 6 शतकं केली आहेत.

फिंचने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतक ठोकले आणि वर्ल्ड कपच्या एका मोसमात दोन किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणारा तो सहावा कर्णधार ठरला आहे. या विक्रमात भारताचा सौरव गांगुली आघाडीवर आहे. त्याने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 3 शतकं ठोकली होती. त्याच्यानंतर ग्लेन टर्नर ( दोन शतकं, 1975), रिकी पाँटिंग ( दोन शतकं, 2003), ब्रँडन टेलर ( दोन शतकं, 2015), केन विलियम्सन ( दोन शतकं, 2019) यांचा क्रमांक येतो.