भारताच्या वर्ल्ड कप संघातील खेळाडूंची IPLमधील कामगिरी कशी झाली, जाणून घ्या!

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेला 15 सदस्यीय भारतीय संघ अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे. रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांची अनपेक्षित निवड यावर बरीच चर्चा झाली. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये या 15 खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कर्णधार विराट कोहलीसह जसप्रीत बुमराहपर्यंत 15 शिलेदारांची आयपीएलमध्ये कामगिरी कशी झाली, चला पाहूया...

विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला यंदाही अपयश आले. त्यांना गटात तळावरच समाधान मानावे लागले. कर्णधार कोहलीनं 14 सामन्यांत 141.46 च्या स्ट्राईक रेटनं 464 धावा केल्या. त्यात एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित शर्मा - मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्माने यंदा इतिहास घडवला. त्याने कर्णधार म्हणून चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावला. त्याने 15 सामन्यांत 139.65 च्या स्ट्राईक रेटने 405 धावा केल्या. त्यात केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

हार्दिक पांड्या - मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने दोन्ही विभागात दमदार कामगिरी केली. फलंदाजीत त्याने 16 सामन्यांत 191.42 च्या स्ट्राईक रेटने 402 धावा केल्या. शिवाय त्याने 14 विकेट्सही घेतल्या.

केदार जाधव - चेन्नई सुपर किंग्सच्या केदार जाधवला फार संधी मिळाली नाही. त्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेच्या अंतिम दोन सामन्यांना मुकावे लागले. त्याने 14 सामन्यांत 162 धावा केल्या.

महेंद्रसिंग धोनी - चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या फलंदाजीनं यंदा प्रभावीत केले. त्याने 15 सामन्यांत 134.62 च्या स्ट्राईक रेटने 416 धावा केल्या.

शिखर धवन - दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शिखर धवनची बॅट यंदा चांगलीच तळपली. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याला गवसलेला सूर ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. धवनने 16 सामन्यांत 5 अर्धशतकांसह 521 धावा केल्या.

दिनेश कार्तिक - वर्ल्ड कप संघात संधी मिळाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकची कामगिरी उंचावेल अशी अपेक्षा होती. पण, त्याने निराश केले. त्याला 14 सामन्यांत 253 धावा केल्या.

लोकेश राहुल - किंग्स इलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुलने फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले. त्याने 14 सामन्यांत 593 धावा केल्या. त्यात एक शतक व 6 अर्धशतकं आहेत.

विजय शंकर - अष्टपैलू म्हणून संघात स्थान पटकावणाऱ्या विजय शंकरला फार काही कमाल करता आली नाही. त्याला 15 सामन्यांत केवळ 244 धावा करता आल्या, तर एकच विकेट घेता आली.

रवींद्र जडेजा - सप्राईज पॅकेज ठरलेल्या रवींद्र जडेजाने 16 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत 106 धावा केल्या.

जसप्रीत बुमराह - भारतीय संघाचा हुकुमी एक्का आणि मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू जसप्रीत बुमराहने 16 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या.

मोहम्मद शमी - किंग्स इलेव्हन पंजाबच्या मोहम्मद शमीनं 14 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या.

भुवनेश्वर कुमार - सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने 15 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या.

कुलदीप यादव - कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा कुलदीप यादव यंदा अपयशी ठरला. त्याने 9 सामन्यांत केवळ चार बळी टिपले

युजवेंद्र चहल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अपयश आले असले तरी युजवेंद्र चहलने आपले नाणे खणखणीत वाजवले, त्याने 14 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या.