Happy Birthday : तीन द्विशतक अन् हॅटट्रिक हिटमॅन रोहितची यशोगाथा..

मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस... 30 एप्रिल 1987 मध्ये नागपूर येथे रोहितचा जन्म झाला. मुंबईकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या रोहितने 2007मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रोहितने 206 वन डे सामन्यांत 41 अर्धशतक आणि 22 शतकं झळकावली आहेत. 27 कसोटींत त्याच्या नावावर 10 अर्धशतकं व 3 शतकं आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने 94 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 4 शतकं आणि 16 अर्धशतकं केली आहेत. हिटमॅन रोहितबाबत अशाच काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊयात...

भारतीय संघाकडून खेळण्याआधी रोहित शर्मा इंडियन ऑईल संघाचे प्रतिनिधित्व करायचा. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारताच्या वन डे संघात स्थान मिळाले.

रोहित शर्माने आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रमही केला आहे. 2009मध्ये त्याने डेक्कन चार्जस संघाचे प्रतिनिधित्व करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. रोहितने त्या सामन्यात अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्युमिनी यांना बाद केले होते.

कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये तीन जेतेपदं जिंकणारा रोहित हा पहिलाच कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते. रोहितनंतर हा पराक्रम महेंद्रसिंग धोनीनं केला. त्यानं 2010, 2011 आणि 2018 साली चेन्नई सुपर किंग्सला जेतेपद पटकावून दिले.

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात बाद फेरीच्या सामन्यात शतक ठोकणारा तो सौरव गांगुलीनंतर दुसरा भारतीय आहे

भारतात कोणत्याही ट्वेंटी-20 सामन्यात शतक करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याने 2007-08च्या सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत गुजरातविरुद्ध 45 चेंडूंत नाबाद 101 धावा केल्या होत्या.

रोहित शर्माच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही फलंदाजाला दोन द्विशतकं करता आलेली नाहीत.

क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतक करणारा रोहित हा दुसरा भारतीय आहे. याआधी सुरेश रैनाने ही कामगिरी केली आहे. त्याने 2010च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकले होते.

वन डे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. त्याने 2014मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली आणि त्यात 33 चौकार मारले होते.

रोहित शर्माचे कसोटी पदार्पणही दणक्यात झाले. त्याने पहिल्याच कसोटीत 177 आणि दुसऱ्या कसोटीत नाबाद 111 धावा चोपल्या. या कामगिरीसह सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर पदार्पणाच्या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीत शतक ठोकणारा रोहित तिसरा भारतीय आहे.

रोहित शर्माला 2015 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. त्याने 2014मध्ये श्रीलंकाविरुद्धात 264 धावा केल्या आहेत.