सहकाऱ्यांचे विक्रम अन् माही कनेक्शन

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघातील सहकाऱ्यांच्या अनेक विक्रमांचा साक्षीदार आहे. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली धाव आणि बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातील दहा हजारावी धाव याचाही तो साक्षीदार राहिला. असे अनेक क्षण धोनीने जवळून अनुभवले आहेत...

विराटने बुधवारी वन डे क्रिकेटमधील दहा हजार धावांचा पल्ला पार केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. विराटने 205 डावांत दहा हजार धावा केल्या. या विक्रमाच्या वेळी महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर विराटसोबत होता.

अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 2007 साली डरबन यथे इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा चेंडूंत सहा षटकार खेचून विक्रम केला होता. या सामन्यात त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ( 12 चेंडूत) सर्वात जलद अर्धशतकही पूर्ण केले होते. याही विक्रमाच्यावेळी धोनी नॉन स्ट्राईक एंडला होता.

आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावण्याचा मान महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पटकावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तेंडुलकरने 147 चेंडूंत नाबाद 200 धावा केल्या होत्या. तेंडुलकरने 25 चौकार आणि 3 षटकार खेचले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे धोनी त्यावेळी मैदानावर उपस्थित होता.

2 नोव्हेंबर 2013 साली रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. रोहितने 158 चेंडूंत 12 चौकार आणि विक्रमी 16 षटकार लगावताना 209 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 57 धावांनी जिंकला होता. याहीवेळेला धोनी नॉन स्ट्राईकला उभा होता.