भारताविरुद्धच्या सामन्यानंतर ख्रिस गेलची तोफ थंडावणार

बुधवारी ख्रिस गेलने आपल्या निवृत्तीचे सुतोवाच केले. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या मीडीया मॅनेजरने गेलच्या निवृत्तीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विश्वचषकातील सामना गुरुवारी मँचेस्टर येथे होणार आहे.

बुधवारी भारताविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला वेस्ट इंडिजची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला गेल आला होता.

पत्रकार परिषदेमध्ये गेलने आपण यानंतर किती सामना खेळणार किंवा किती सामने खेळायला उत्सुक आहे, याबद्दल भाष्य केले.

गेलच्या या म्हणण्यानुसार तो आता निवृत्ती पत्करणार, असे बऱ्याच जणांना वाटत होते. त्यामुळे पत्रकारांनी या परिषदेनंतर वेस्ट इंडिजच्या मीडिया मॅनेजरला गाठले. मीडिया मॅनेजरने गेल हा भारताविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ऑगस्ट महिन्यात मालिका होणार आहे. गेल भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. या मालिकेनंतर गेल निवृत्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.

कारण यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेत तो खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे.