ख्रिस गेलनं इंग्लंडला झपाटल्यासारखं झोडलं, पण...

ख्रिस गेलनं सहा महिन्यानंतर वन डे संघात दमदार कमबॅक केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात गेलने शतकी खेळी साकारली आणि वेस्ट इंडीज संघाला ३६० धावांचा डोंगर उभा करून दिला.

ख्रिस गेलने कारकिर्दीतील २४ वे शतकं शंभर चेंडूत पूर्ण केले. या सामन्यात गेलनं तुफान फटकेबाजी केली. त्यानं जवळपास १२ षटकार ठोकले.

वन डे क्रिकेटमध्ये तीन प्रतिस्पर्धीविरुद्ध एकाच सामन्यात १० पेक्षा अधिक षटकार खेचले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

गेलने याआधी झिम्बाब्वे ( २०१५) आणि संयुक्त अरब अमिराती ( २०१८) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. त्याने यासह एबी डिव्हिलियर्स, मार्टिन गुप्तील आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले. या तिघांना दोनदाच एका सामन्यात १० पेक्षा अधिक षटकार मारता आले आहेत.

ख्रिस गेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध १०० षटकारांचा विक्रम केला आणि असे शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानं इंग्लंडविरुद्ध वन डे त ५७, ट्वेंटी-२०त २८ आणि कसोटीत १५ षटकार मारले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही गेलनं नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा ४७६ षटकारांचा विक्रम मोडला.

गेलच्या नावावर ४८८ आंतरराष्ट्रीय षटकार जमा झाले आहेत. त्याने वन डेत २८७,ट्वेंटी-२० त १०३ आणि कसोटीत ९८ षटकार लगावली आहेत. यातील ४८७ षटकार हे वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व करताना, तर एक षटकार जागतिक एकादश संघाकडून मारला आहे.

गेलनं या सामन्यात १२ षटकार खेचून आणखी एक विक्रम नावावर केला. एकाच वन डे सामन्यात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या विंडीज खेळाडू दिनेश रामदिनचा (११) विक्रमत्यानं मोडला. रामदिननं २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ११ षटकार लगावले होते.

पण गेलच्या या विक्रमांना इंग्लंडच्या जेसन रॉय ( १२३) आणि जो रूट (१०२) यांनी सडेतोड उत्तर दिले आणि संघाला ६ विकेट राखून विजय मिळवून दिला.

सर्वाधिक २३ षटकारांचा विक्रमही वेस्ट इंडिज वि. इंग्लंड या सामन्यात नोंदवला गेला. २०१४ मध्ये न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज या सामन्यात २२ षटकार लागले होते. वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग कराणारा तिसरा यशस्वी सामना ठरला आहे. इंग्लंडने यासह भारत वि. ऑस्ट्रेलिया यांचा (३६० धाव ) विक्रम मोडला.