क्रिकेट वर्ल्ड स्पर्धेवर 'या' संघांनी टाकला होता बहिष्कार, आता भारताने करावा विचार!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर घरत आहे. भारताने हा सामना खेळला नाही, तरी जेतेपदाच्या शर्यतीत ते कायम राहू शकतात आणि तितकी क्षमता या संघात आहे. त्यामुळे भारत-पाक सामना नकोच, असा मतप्रवाह वाढत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत सामन्यावर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ ठरणार नाही. याआधीही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज व न्यूझीलंड यांनी वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यातून माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने 1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली होती. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना संयुक्तपणे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. मात्र, LTTE संघटनेने श्रीलंका सरकारच्या विरोधात कोलंबोत काही बॉम्ब स्फोट घडवून आणले आणि त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया संघाने कोलंबोत सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीलंकेला वॉकओव्हर देण्यात आले.

ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वेस्ट इंडिजनेही सुरक्षेच्या कारणास्तव 1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्घचा सामना खेळला नव्हता. त्यामुळे श्रीलंकेला आणखी एक वॉक ओव्हर मिळाला आणि त्यांनी गटात अव्वल स्थान पटकावले. वेस्ट इंडिज चार गुणांसहे चौथ्या स्तानावर राहिला, परंतु उपांत्य फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली.

इंग्लंडने 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातूनच माघार घेतली होती. झिम्बाब्वेत सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ताणल्यामुळे इंग्लंडने हरारे येथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे इंग्लंडला फटका बसला आणि त्यांना सलग दुसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करता आला नाही.

2003 च्याच वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघाला दहशतवाद्यांकडून धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव केनियाविरुद्धच्यात सामन्यात खेळण्यास नकार दिला.