आयुष्याच्या खेळपट्टीवरची अभेद्य जोडी; अशी आहे 'द वॉल'ची लव्ह स्टोरी

भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणारा राहुल द्रविड नागपुरचा जावई आहे. डॉ. विजेता पेंढारकरसोबतची त्याची पार्टनरशिप त्याचं बिरुद 'द वॉल'सारखीच भक्कम आहे. द्रविड आणि पेंढारकर कुटुंब एकमेकांना तब्बल 35 वर्षांपासून ओळखतं. तर राहुल आणि विजेता यांच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.

विजेताचे वडील निवृत्त विंग कमांडर आहेत. कामामुळे देशातील अनेक ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. निवृत्तीनंतर पेंढारकर यांचं कुटुंब नागपुरात स्थायिक झालं. त्याआधी 1968 ते 1971 मध्ये हे कुटुंब बंगळुरुत राहायचं. तेव्हा त्यांची द्रविड कुटुंबीयांशी ओळख झाली. यानंतर राहुल द्रविडचे वडील शरद काही काळ नागपुरात होते.

राहुल आणि विजेता तरुणपणीच एकमेकांना भेटले. राहुल संधी मिळेल तेव्हा विजेताला भेटायला नागपुरला जायचा. तेव्हा या दोघांच्याही मित्र परिवाराला या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न पडला. मात्र अबोल असलेल्या राहुलनं याबद्दल कोणालाच काही सांगितलं नाही. या दोघांच्या मनातील भावना ओळखून अखेर कुटुंबीयांनीच पुढाकार घेतला.

भारतीय संघाचा आधारस्तंभ असल्यानं द्रविड कायमच चर्चेत असायचा. तर विजेताचं आयुष्य याच्या अगदी उलट होतं. राहुल आणि विजेताचं लग्न 2002 मध्ये होणार होतं. मात्र 2003 च्या विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू असल्यानं राहुलकडे फारसा वेळ नव्हता. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्याआधी दोघांचा साखरपुडा झाला.

2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान विजेता आणि राहुल सोबत होते. मात्र विजेता कायमच माध्यमांपासून दूर राहिली. स्पर्धा संपल्यावर राहुल आणि विजेताचा विवाह सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या लग्नाला राहुलनं त्याच्या काही मोजक्या मित्रांना आमंत्रित केलं होतं. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य राहुलनं कायम वेगळं ठेवलं.

राहुल आणि विजेता यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा समित 13 वर्षांचा आहे, तर लहान मुलागा अन्वय 9 वर्षांचा आहे. प्रसिद्धीपासून, वादांपासून कायम चार हात लांबणारा राहुल सध्या कुटुंबाला वेळ देतो आहे. मात्र तरीही त्याच्यातलं क्रिकेट त्याला शांत बसू देत नाही. राहुल भारतीय अ संघाचा आणि 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली 19 वर्षांखालील संघानं विश्वचषक जिंकण्याची किमयादेखील साधली आहे.