अश्विनने मोडला सर्वात वेगवान 300 बळी घेण्याचा विक्रम

भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. लाहिरू गमागे आश्विनचा ३०० वा बळी ठरला. त्याला त्याने ‘दुसरा’ चेंडूवर बाद केले. आश्विनने २५.१५ च्या सरासरीने बळी घेतले आहेत.

आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यात समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा आश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणा-या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे.

बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि इरापल्ली प्रसन्ना (१८९) हे जगप्रसिद्ध त्रिकूट आश्विनच्या तुलनेत पिछाडीवर आहे.