2 एप्रिल 2011: धोनीचा 'हेलिकॉप्टर शॉट' अन् अंगावर शहारे आणणारा क्षण

2 एप्रिल 2011 चा तो दिवस आठवतो का? मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाला पराभूत केले. धोनीच्या 'हेलिकॉप्टर शॉट'नंतर संपूर्ण देशभरात आनंदाची लाट आली होती. आठ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता आणि 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता.

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न याच दिवशी पूर्ण झाले होते. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 19 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरला अंतिम सामन्यात फलंदाजीत अपयश आले. त्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली.

भारताचे तगडे फलंदाज माघारी परतले असताना गौतम गंभीरने एका बाजूने खिंड लढवली. त्याच्या 97 धावांच्या खेळीनं सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजयी षटकारानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर घेतलेली धाव. गुडघ्यावर बसून भर मैदानात ढसाढसा रडणारा युवराज आणि तेंडुलकरला मारलेली मिठी हे क्षण आजही डोळ्यासमोर ताजे आहेत. युवराजने या संपूर्ण स्पर्धेत 362 धावा व 15 विकेट्स घेतल्या आणि त्याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

भारतीय संघातील खेळाडूंनी सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून वानखेडे स्टेडियमला विजयी प्रदक्षिणा घातली.

वर्ल्ड कप विजयाचा मेडल स्वीकारताना तेंडुलकरलाही गहिवरून आले होते.

हजारो चाहत्यांच्या साक्षीनं भारतीय संघाने वर्ल्ड कप उंचावला.