भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पाहुण्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघ कमकुवत वाटत आहे आणि भारताला येथे कसोटी मालिका जिंकण्याची ही सुवर्णसंधी आहे. भारताच्या सध्याच्या संघातील अनेक खेळाडू पुढच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघात नसतील आणि त्यामुळे ते यंदा आपली छाप सोडण्यासाठी आतुर आहेत.

भारताच्या कसोटी संघातील फलंदाजीचा पाठीचा कणा असलेल्या मुरली विजयचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा मानला जातो. त्याचा सध्याचा फॉर्म फारसा चांगला नाही. त्याला दहा डावांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

रवीचंद्रन अश्विनने गेल्या सात वर्षांहून अधिक काळ भारताच्या फिरकीची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. मात्र, तोही निराशाजनक कामगिरीशी झगडत आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अश्विनचे कसोटीतील स्थानही धोक्यात आले आहे.

2002 मध्ये पार्थिव पटेलने कसोटी संघात खेळणाऱ्या युवा यष्टिरक्षकाचा मान मिळवला होता. मात्र, यष्टिमागे त्याला अपयश आले आणि महेंद्रसिंग धोनीच्या आगमनानंतर पटेल दुर्लक्षित राहिला. ऑस्ट्रेलिया मालिकेतील कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

दिनेश कार्तिक गेली 14 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे, परंतु त्याचाही हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचा दौरा असण्याची शक्यता आहे.

महेंद्रसिंग धोनीचाही हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा धोनी भारताच्या वन डे व ट्वेंटी-20 संघाचा अजुनही सदस्य आहे. ट्वेंटी-20 संघात सध्या त्याला स्थान दिले नसले तरी वन डे मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे.