Budget 2019 : अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:48 PM2019-02-01T13:48:01+5:302019-02-01T14:20:42+5:30

मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. अर्थसंकल्पातील मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया.

नरेंद्र मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. हे अंतरिम बजेट असलं तरी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसारच, करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट 5 लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशभरातील 3 कोटी करदात्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

पीयूष गोयल यांनी रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात धावणार आहे. सर्व मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे. रेल्वेचं नुकसान कमी होण्यासाठी मोठं काम केलं आहे.

चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे.

पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना मध्यमवर्ग तसेच वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. बँका तसेच पोस्ट ऑफिसेसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा 10 हजार रूपयांवरून 40 हजार रुपयांवर नेत असल्याची घोषणा केली आहे.

मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत मांडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी रजा देण्यात आली आहे.

पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना कामगार क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा दुप्पट करताना नवीन पेन्शन योजनेमध्येही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. गोयल यांनी कामगारांसाठीची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. आता जास्तीत जास्त 20 लाख रुपयांची ग्रॅच्युईटी दिली जाणार आहे.