चमकदार आणि सुंदर दातांसाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:22 AM2018-11-28T11:22:21+5:302018-11-28T11:30:09+5:30

तुमची सुंदर स्माइल एखाद्याचा दिवस चांगला करु शकते. पण यासाठी तुम्हाला तुमच्या दातांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. पण तुम्ही दातांच्या काळजीकडे दुर्लक्ष केलं तर तुमची स्माइल आकर्षक वाटणार नाही. केवळ स्माइलमुळेच नाही तर दातांशी संबंधित समस्यांमुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे चेहऱ्यांच्या सुंदरतेसोबतच दातांच्या सुंदरतेची काळजी तितकीच महत्त्वाची ठरते. दातांची काळजी घेण्याच्या अशात काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. (Image Credit : Medlife.com)

दातांची अलायन्मेंट करावी - दात तेव्हाच चांगल्याप्रकारे स्वच्छ होऊ शकतात जेव्हा त्यांची अलायन्मेंट योग्य असेल. मागे-पुढे असलेल्या किंवा वाकड्या दातांची स्वच्छता चांगल्याप्रकारे होऊ शकत नाही. त्यात पदार्थांचे कण जमा होऊन किटाणू तयार होतात. अशावेळी दंततज्ज्ञांकडे जाऊन दातांची स्वच्छता करुन घेतली पाहिजे. मागे-पुढे झालेल्या दातांना ब्रेसेसच्या मदतीने सरळ केलं जाऊ शकतं. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठीही दंततज्ज्ञ ब्लीचिंग करु शकतात.

दिवसातून दोनदा ब्रश करा - दात स्वच्छ, निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचं आहे. एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा. त्यासोबच दर सहा महिन्यांनी डेंटल चेकअप करावं. जास्त गोड पदार्थ खाऊ नये. कॅंडी, चॉकलेट, चिकटणारे पदार्थ जास्त खाऊ नये. कारण हे पदार्थ दातांमध्ये चिकटून राहतात आणि दातांचं नुकसान करतात. इतकेच नाही तर दातांवर हळद, कॉफी, चहा, आयर्न टॅबलेट, स्मोकिंगने डाग पडतात. त्यामुळे यांचा वापर केल्यावर दात चांगले स्वच्छ करा.

कोमट पाण्याने गुरळा करा - काहीही खाल्ल्यानंतर कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून याने गुरळा करावा. याने दातांच्या फटांमध्ये अडलेले पदार्थांचे कण निघतात. जर गरम पाणी नसेल तर साध्या पाण्यानेही तुम्ही गुरळा करु शकता. जेवणाच्या अर्धा तासांपूर्वी किंवा नंतर ब्रश करावा.

ब्रश करण्यासाठी कडूलिंब - ऋतु कोणताही असो जास्त गरम पदार्थ खाऊ नये किंवा जास्त थंड पदार्थ खाऊ नये. जर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर याची वेगवेगळी कारणे असू शकतात. हिरड्यांची समस्या असेल तर त्यातून रक्तही येतं. ज्या लोकांना सायनसची समस्या असेल त्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते. या समस्यांकडे दुर्लक्ष करु नये आणि वेळीच उपचार करावे. कडूलिंबाच्या मदतीने दात स्वच्छ केल्यास दातांच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतात.

रात्री गोड पदार्थ टाळा- सायंकाळी ७ नंतर शक्य झाल्यास गोड पदार्थ खाऊ नये. कारण रात्रभर गोड पदार्थांचे कण दातांमध्ये अडकून राहतात आणि याने दातांमध्ये किटाणू होतात. दातांवर पिवळेपणा आला असेल तर सोडा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करुन काही मिनिटांसाठी दातांवर लावा. हा उपाय काही दिवस केल्यास याने फायदा होईल.

भरपूर पाणी प्यावे - आरोग्यसोबतच दात चांगले ठेवण्यासाठीही भरपूर पाणी पिणे फायद्याचे आहे. कमी पाणी प्यायल्याने दातांना संक्रमणाचा धोका असतो. भरपूर पाणी न प्यायल्याने तोंडात योग्य प्रमाणात लाळ तयार होत नाही. याने संक्रमण वेगाने पसरतं. तसेच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही.