पहिली कार घेताना....कोणती काळजी घ्यावी...?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:49 PM2018-12-25T14:49:44+5:302018-12-25T14:54:42+5:30

पहिली कार घेताना पुरेसा अभ्यास न केल्यास कार घेतल्यानंतर पश्चात्तापाची वेळ येते. तुमच्या सोबत किंवा मित्रपरिवारामध्ये असे कधीतरी झालेच असेल. पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या उक्तीप्रमाणे तुम्ही सावध व्हावे यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्हाला तुमच्या कारची निवड करणे आणखी सोपे होणार आहे.

आर्थिक क्रांतीमुळे तरुणांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा खुळखुळत आहे. यामुळे ते महागड्या गाड्या घेण्याकडे जास्त झुकतात. त्यांना आरामात कर्जही उपलब्ध होते. मात्र, यावेळी ते अन्य काही खर्चिक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत.

मेन्टेनन्स, विमा आणि इंधनावर किती खर्च करावा लागणार आहे, याचे गणितच मांडले जात नाही. यामुळे पूर्ण रक्कम कारवर खर्च करण्यापेक्षा मालकीचा खर्च पाहणे गरजेचे आहे.

नवीन कार घेताना तुमच्या आवडत्या कारवर चांगली सूटही मिळू शकेल. मात्र, या कारचा मेन्टेनन्स तेवढाच आकर्षक असेल का याची काय गॅरंटी? पहिली नवीन कार म्हणजे, नुकत्याच चालवायला शिकलेल्यांचा शिरकाव अधिक. अशावेळी कारला छोट्यामोठ्या अपघात, डेंट, घासण्याची शक्यता आहे.

पेट्रोल की डिझेल हा मोठा प्रश्न आहे. यावर आम्ही सविस्तर लिहूच. मात्र, आपला वापर किती? किती दिवस कार बंद राहते? यावर कोणती कार घ्यावी हे ठरवावे लागते. सध्या गोवा वगळता इतरत्र दोन्ही इंधनांमधील फरक 10 रुपयांचा आहे. तसेच अॅव्हरेजमध्येही 5-6 किमीचा फरक येतो. यामुळे तोही विचार होणे आवश्यक आहे.

कार वर्कशॉपमध्ये आठवडाभर तरी ठेवावी लागते. शिवाय कार नादुरुस्त झाल्यास तिचे स्पेअरपार्ट सहजासहजी उपलब्ध होतात का हे देखील पाहावे. यामुळे कोणत्याही कंपनीची कार निवडण्य़ाआधी विक्री पश्चात सेवा कशी आहे हे पाहावे.

दर तीन वर्षांनी जुन्या कारचे नवीन अपडेट किंवा पूर्णता नवीन मॉडेल लाँच केले जाते. तंत्रज्ञान आणि अन्य फिचर्स नवीन असतात. यामुळे आपली कार जुनी वाटायला लागते. स्वाभाविकच आहे. यामुळे तुम्ही घेताय ती कार एक वर्ष आधी आली असेल तर दोन वर्षातच जुनी वाटायला लागते. याचाही विचार केला जावा.

यामुळे ज्या कारची रिसेल व्हॅल्यू जास्त असेल तिच कार निवडावी. महत्वाचे म्हणजे ज्या कारचे स्पेअरपार्ट सहज मिळतात त्या कारना जास्त किंमत मिळते.