नॅनोनंतर टाटा सर्वात मोठी हेक्सा बंद करणार; नवी 7 सीटर एसयुव्ही येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 06:39 PM2019-07-04T18:39:01+5:302019-07-04T18:42:04+5:30

टाटा मोटर्स रतन टाटांच्या स्वप्नातील कार छोटीशी नॅनो बंद केल्यानंतर आता त्यांची सर्वात मोठी कार हेक्साही बंद करण्याच्या विचारात आहे. टाटाने नुकतीच पाच सीटर हॅरिअर लाँच केली आहे. मात्र, आणखी एकक नवीन सात सीटर कार टाटा आणणार आहे.

टाटा मोटर्स येत्या काळात एसयुव्ही Buzzard ही बहुप्रतिक्षित कार लाँच करणार आहे. ही कार टाटा हॅरिअरचे 7 सीटर व्हर्जन आहे. ही कार जिनिव्हाच्या मोटर शो मध्ये दाखविण्यात आली होती.

बजार्ड या वर्षीच्या शेवटी किंवा 2020 च्या सुरूवातीला लाँच केली जाणार आहे. ही कार हेक्साची जागा घेणार आहे. भारतात बीएस 6 नियमावली लागू होण्यापूर्वी टाटा हेक्सा बंद करणार आहे.

हॅरिअर एसयुव्हीसारखीच ही कार दिसणारी आहे. तसेच लँड रोव्हरच्या D8 प्लॅटफॉर्मवर ही विकसित करण्यात आली आहे. याच प्लॅटफॉर्मवर डिस्कव्हरी स्पोर्ट एसयुव्ही आहे. बजार्ड एसयुव्हीमध्ये हॅरिअरचेच 2.0 लीटर क्रायोजेनिक इंजिन देण्यात आले आहे. जे हॅरिअरपेक्षा ताकदवान असेल. तसेच बीएस 6 एमिशन नॉर्म पूर्ण करेल.

यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ह्युंदाईकडून घेतलेला 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर अॅटोमॅटीक गिअरबॉक्स मिळणार आहे.

टाटाने 2017 मध्ये हेक्सा लाँच केली होती. यामध्ये 2.2 लीटर इंजिन होते. कंपनीच्या निर्णयानुसार 2.2 लीटरचे डिझेल इंजिन केवळ व्यावसायिक वाहनांनाच दिले जाणार आहे.

व्यावसायिक वाहनांच्या तुलनेत पॅसेंजर व्हेईकलसाठी बीएस 6 नॉर्म जास्त कठोर आहेत. यामुळे कमी गुंतवणूक करून व्यावसायिक गाड्यांचे इंजिन अद्ययावत केले जाऊ शकते. यामुळे गाड्यांच्या किंमती नियंत्रणात राहणार आहेत.