एक छोटेसे यंत्र, जे उन्हात तापलेली कार झटक्यात थंड करेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:52 AM2019-04-16T08:52:27+5:302019-04-16T08:58:22+5:30

घरातून ऑफिसला जाणे किंवा अन्य कुठे फिरायला जात असाल तर उन्हात कार पार्क केल्यास आतमध्ये बसताना लाहीलाही होऊन जाते. कारण कारमधील प्लॅस्टिक आणि पत्रा तापमानाच्या दुप्पटीने तापलेला असतो. जेव्हा कार उभी असते तेव्हाच तिच्यातील गरम हवा बाहेर गेली तर कार किती थंड होईल ना. हो, काही अंशी बरेच थंड होईल आणि एसी सुरु होऊन थंडावा निर्माण होईपर्यंत तर नक्कीच दिलासा देईल. असे एक यंत्र आहे जे तुमच्या कारची बॅटरी न संपवता वापरता येऊ शकते.

उन्हाळ्यात आपण एक ऊर्जा अशीच वाया जाऊ देतो, ती म्हणजे सौरऊर्जा होय. या ऊर्जेचा वापर जर आपण कार आतून थंड ठेवण्यासाठी केला तर किती भारी ना. एक छोटेसे डिव्हाईस खिडकीच्या तावदानावर बसविल्यास हे सहज शक्य आहे.

सोलार फॅन असे त्याला म्हणतात. हा फॅन कार उन्हात पार्क असतानाही लावू शकतो, किंवा सायंकाळी कार चालवितानाही लावल्यास इंधनाची बचत होते.

एसी लावून कार चालवितानाही हा सोलार फॅन कार दुप्पट वेगाने थंड ठेवण्यास मदत करतो.

हा एक छोटासा फॅन असतो जो सोलार पॅनल्सची वीज वापरतो. हे सोलारपॅनल्स या फॅनला जोडलेले असतात. सोलार फॅन हा दिवसा वापरला जातो. कधी कधी या फॅनला उष्णता वाढविण्यासाठीही वापरता येईल. हा फॅन तेव्हा सर्वात जास्त वेगाने काम करतो जेव्हा बाहेरील उष्णता जास्त असेल. या फॅनमुळे एसीचा वापरही कमी होतो.

तुम्हाला वाटत असेल की हा फॅन खूप किंमतीचा असेल, पण तसे नाही. या फॅनची किंमत 350 रुपयांपासून सुरू होते, ती 800 रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला बॅटरीअसलेला सोलार फॅन घ्यायचा असेल तर त्यांची किंमत 1500 रुपयांपासून 3500 रुपयांपर्यंत जाते.

सोलार फॅन्स ऑटोमोबाईल स्पेअरपार्टच्या दुकानात किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

टॅग्स :वाहनAutomobile