दोन बॅटरींवर चालणारी नवी ईलेक्ट्रीक स्कूटर आली...दुप्पट अंतर कापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:00 PM2019-03-23T15:00:34+5:302019-03-23T16:53:37+5:30

नवी दिल्ली : देश इंधनक्रांतीच्या उंबरठ्यावर असताना विविध कंपन्यांनी त्यांची इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. Avan Motors ने नुकतीच Trend E ही इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध झाली आहे.

ही स्कूटर एक आणि दोन बॅटरी अशा पर्यायांमध्ये येणार आहे. एकाच बॅटरीच्या मॉडेलची किंमत 56900 रुपये तर दोन बॅटरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 81269 रुपये असणार आहे. अवान ट्रेंड ई ही स्कूटर रेड-ब्लॅक, ब्लॅक रेड, व्हाईट ब्ल्यू अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

अवानच्या या नव्या इलेक्ट्रीक स्कूटरची एक बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 60 किमी आणि दोन बॅटरींची स्कूटर 110 किमीचे अंतर कापू शकणार आहे. स्कूटरमध्ये लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली असून ती 2 ते 4 तासात चार्ज होते. या स्कूटरची टॉप स्पीड 45 किमी प्रतीतास आहे. तर 150 किलोचे वजन ही स्कूटर वाहून नेऊ शकणार आहे.

स्कूटरमध्ये 16 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. पुढील बाजुला डिस्क आणि पाठीमागे ड्रम ब्रेक आहेत. स्कूटरमध्ये हायड्रॉलिक टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि कॉईल स्प्रिंग रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. मागे बसणाऱ्यासाठी छोटे बॅकरेस्ट, सीटच्या आत आणि पुढील बाजुला वस्तू ठेवण्यासाठी जागा, बॉटल होल्डर आहेत. शिवाय इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 'स्मार्ट की' फिचर देण्यात आले आहे, जे कारसारखी लॉकची सुविधा देते.

ही नवीन स्कूटर या कंपनीची Xero श्रेणीतील तिसरी स्कूटर आहे. याआधी कंपनीने Xero आणि Xero प्लस अशा दोन स्कूटर बाजारात आणल्या होत्या.

स्कूटर्ससह कंपनी मोटरसायकलवरही काम करत आहे. पुढील वर्षी ही बाईक लाँच होण्याची शक्यता आहे.