मारुतीची पहिली इलेक्ट्रीक कार 2020 ला; पण कंपनी 'टेन्शन'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:03 PM2019-05-27T15:03:28+5:302019-05-27T15:06:48+5:30

इलेक्ट्रीक कारच्या स्पर्धेत महिंद्रा, टाटाने बाजी मारलेली असताना पुढील वर्षी देशातील तगडी कंपनी मारुती सुझुकीही तिची पहिली इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये मारुतीने ही कार दाखविली होती.

देशभरातील सध्याची इलेक्ट्रीक कारसाठी अनुकूल नसलेली परिस्थिती, जादा किंमत आणि चार्जिंग स्टेशनची कमतरता यामुळे ही कार 2020 मध्ये लाँच केली जाणार असली तरीही कंपनी फेरविचार करत आहे.

मारुती नव्या वॅगन आर कारलाच इलेक्ट्रीक बनविणार आहे. या कारचे रुप काहीसे वेगळे असणार आहे. मारुतीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, सध्या ऑटो इंडस्ट्री कठीण परिस्थितीतून जात आहे. पुढील वर्षी जरी इलेक्ट्रीक कार लाँच होणार असली तरीही तिची किंमत खूपच जास्त असणार आहे. नव्या वॅगनआरचे टेस्टिंग झालेले आहे. मात्र, या कारचे उत्पादन आणि विक्री ही ग्राहकाच्या मानसिकतेवर आणि चार्जिंग सुविधेवर अवलंबून असणार आहे.

मारुती सध्या 50 इलेक्ट्रीक वॅगन आर कारची रस्त्यावर टेस्टिंग करत आहे. मात्र, ही कार खरेदी करण्यासाठी आणि चालविण्यासाठी परवडणारी किंमत असल्यास ग्राहक याकडे वळू शकणार आहेत.

सध्याच्या तंत्रज्ञानानुसार हे शक्य नाहीय. कंपनीचे कार्यकारी संचालक केनीची अयुकावा यांनी सांगितले की, या कारची किंमत 12 लाखांवर असणार आहे. तर त्याच वॅगनआरचे पेट्रोल मॉडेल 4.2-5.7 लाखांमध्ये मिळत आहे. यामुळे आम्ही या कारच्या लाँचिंगबाबत फेरविचार करत आहोत.

सरकारने जरी कर कमी केलेला असला तरीही फेम II मध्ये खासगी ग्राहक जर कार खरेदी करत असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून कोणतीही योजना किंवा सूट देण्यात आलेली नाही.