सावधान...! वाहतुकीचे हे आठ नियम मोडाल तर दंड भरावा लागेल..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:27 PM2018-11-21T18:27:35+5:302018-11-21T18:32:45+5:30

'नजर हटी दुर्घटना घटी', 'मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक' अशाप्रकारचे स्लोगन रस्त्यावरून जाताना नेहमीच दिसतात. मात्र, वाहन चालविताना केलेल्या काही चुका आपपल्याला दंडास पात्र ठरवतात. शहरांमध्ये आता कॅमेऱ्यांमध्ये पाहून पावत्या पाठविल्या जातात. यामुळे वेळीच सावध झालेले बरे नाहीतर खिशाला भुर्दंड पडायचा. आज आम्ही तुम्हाला वाहन चालविताना होणाऱ्या चुका सांगणार आहोत...ज्या दंडास पात्र असतात.

शहरात बऱ्याच रस्त्यांवर नो पार्किंगचा फलक लागलेला असतो. काही ठिकाणी वाहतूक कोंडी होते म्हणून तर काही ठिकाणी चौक किंवा अतिमहत्वाची ठिकाणे असतात म्हणून. जर तुम्ही कोणत्याही शाळा, हॉस्पिटल किंवा सरकारी कार्यालयांच्या गेटसमोर वाहन उभे करत असाल तर दंड भरावा लागतो. याशिवाय बस स्टॉप, ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि महत्वाच्या रस्त्यावर गाडी उभी केल्यासही दंड भरावा लागू शकतो.

रात्री 10 नंतर वाहतुकीचे नियम नाही पाळले तरी चालतात, असा करत बऱ्याचदा केला असेल ना. जर असा विचार करत असला तर चुकीचे आहे. खरेतर बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल रात्री 10 नंतर बंद असतात किंवा ब्लिंक होतात. यामुळे असा समज निर्माण होणे स्वाभाविकच आहे. यामुळे ज्या-ज्या ठिकाणी लाईट काम करते तिथे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शहरांमध्ये रात्रीच्यावेळी अपघातांचे वाढलेले प्रमाण यामुळेच असते. यामुळे सावध तो सुखी या उक्ती प्रमाणे चौक पार करताना सावधतेनेच वाहन चालविलेले फायद्याचे असते.

वनवेवर उलट्या बाजुने वाहन चालविणे किंवा रिव्हर्स घेणे ही सवयही बदलायला हवी. बऱ्याचदा उलट्या दिशेने वाहन चालविल्याने अपघात झालेले आहेत.

हाय बीमचा वापर करणेही शक्यतो टाळले पाहिजे. ज्याठिकाणी जास्त अंधार असतो त्याठिकाणीच अपरचा वापर करावा. कारण समोरून येणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यात प्रकाश पडल्यास तो आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते. यामुळे शहरात अपरमध्ये गाडी चालविल्यास पावती भरावी लागू शकते.

दारु पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. तरीही बऱ्याचदा मोठमोठे ट्रकसह कारचालकही नशेमध्ये असल्याचे आढळले आहे. दारु पिल्याने गाडीवरील ताबा सुटून बऱ्याचदा अपघात झालेले आहेत. शरिरामध्ये 0.03 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असता नये. दारु पिऊन गाडी चालविल्यास पावती फाडण्यासह न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागते.

गाडी चालविताना मोबाईल किंवा ब्लुटुथ, वायरलेस हेडफोनवर बोलणे धोक्याचे असते. यामुळे दंड भरावा लागू शकतो. महत्वाचा फोन असल्यास गाडी बाजुला घेऊन बोलावे. मात्र, वाहतुकीस अडथळा होईल असे वागू नये.

काही ठिकाणांवर वेगमर्यादा नेमून दिलेली असते. शाळा, लष्कराची ठिकाणे किंवा महत्वाचे रस्ते, पूल यावर वेगाची मर्यादा दिलेली असते. ती न पाळल्यासही दंड भरावा लागू शकतो.

मोटारसायकलला जसे हेल्मेट आवश्यक आहे तसेच कारला सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे. यामुळे अचानक ब्रेक दाबावा लागल्यास पुढे आदळण्यापासून वाचू शकता. यामुळे सीटबेल्ट न लावल्यास दंड भरावा लागू शकतो.