बोर्डीकरांच्या बैठकीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांवर जोरदार टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 07:42 PM2019-03-18T19:42:04+5:302019-03-18T19:44:11+5:30

भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालविली आहे.

Tough criticism of alliance and alliance candidates in the meeting of BordiKar | बोर्डीकरांच्या बैठकीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांवर जोरदार टीका

बोर्डीकरांच्या बैठकीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांवर जोरदार टीका

Next

परभणी- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घ्यावयाच्या राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या समर्थकांच्या बैठकीत माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडी व युतीच्या उमेदवारांवरच जोरदार हल्लाबोल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे बोर्डीकरांनी निवडणूक लढविण्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगून सर्व कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले आहे. 

भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालविली आहे. शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढतील व भाजपाची उमेदवारी आपणाला मिळेल, असा त्यांचा अंदाज होता; परंतु, राज्यस्तरावर दोन्ही पक्षांची युती झाली. त्यामुळे बोर्डीकर यांची गोची झाली. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी दिल्या. तयारी केली; परंतु, प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपल्याने या निवडणुकीत काय राजकीय भूमिका असावी, याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी परभणीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. 

मेघना बोर्डीकर यांचा हल्लाबोल 
या बैठकीत बोलताना मेघना बोर्डीकर यांनी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर व युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशा काही जणांकडून नुस्त्याच गप्पा केल्या जातात; परंतु, ते आपण प्रत्यक्षात करुन दाखविले, असे सांगून त्यांनी मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा आरोप खा. जाधव यांच्यावर केला. तर वडील माजी आमदार होते. स्वत: उमेदवार राज्यमंत्री दर्जा असलेले जि.प.अध्यक्ष होते, आता जि.प.सदस्य आहेत. बाजार समितीचे सभापती आहेत. तरीही लोकांकडून निधी गोळा करण्याची नौटंकी करीत आहेत. त्यांची ही नौटंकी चालणार नाही. भावनिक बाबींना परभणीची जनता आता थारा देणार नाही, असे सांगून आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

बोर्डीकरांना राज्यभरातील 'दादा' ओळखतात 
सोशल मीडियावर त्यांच्यावर केल्या जात असलेल्या टिकेचा समाचार घेऊन त्यांनी महिला म्हणून मला कमजोर समजू नका, मी बोर्डीकरांची कन्या आहे आणि बोर्डीकरांना राज्यभरातील ‘दादा’ ओळखतात, असे बोर्डीकरांच्या स्वरात सांगितले. आजच्या बैठकीची गर्दी ही शक्तीप्रदर्शन असे काही जण सांगतात; परंतु, हे शक्तीप्रदर्शन नसून खरे शक्तीप्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दाखवून देईल, असे सांगितल्यानंतर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सभागृहात कुजबूज सुरु झाली. काही वेळातच माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी निवडणुकीसंदर्भातील भूमिका येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले.  

निवडणूक लढविण्याची शक्यता कमीच
सोमवारच्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी भाषणामध्ये युतीचा धर्म बाजुला ठेवून शिवसेनेला लक्ष केले. तर राष्ट्रवादीचाही समाचार घेतला. त्यानंतर प्रारंभी मेघना बोर्डीकर यांनी भाषणाच्या प्रारंभी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. दोन्ही प्रमुख उमेदवारांवर जोरदार टिका केली. त्यामुळे त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. तर माजी आ.बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकसानकारक होईल, अशी कोणतीही कृती करणार नाही, असे सांगून आपली भूमिका उपस्थितांना कळाली असेल, असे सूचक भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या भाष्यावरुन राजकीय जानकार मेघना बोर्डीकर या निवडणूक लढविण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगत आहेत. 

Web Title: Tough criticism of alliance and alliance candidates in the meeting of BordiKar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.