परभणी तालुक्यातील स्थिती:अकरा गावांमध्ये केले जलस्त्रोतांचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:35 AM2019-04-27T00:35:44+5:302019-04-27T00:36:09+5:30

तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील कार्यालयाने ११ गावांतील प्रस्तावांना मुंजरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये गोविंदपूरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

Status in Parbhani taluka: Acquisition of water sources in eleven villages | परभणी तालुक्यातील स्थिती:अकरा गावांमध्ये केले जलस्त्रोतांचे अधिग्रहण

परभणी तालुक्यातील स्थिती:अकरा गावांमध्ये केले जलस्त्रोतांचे अधिग्रहण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी १९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी तहसील कार्यालयाने ११ गावांतील प्रस्तावांना मुंजरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामध्ये गोविंदपूरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
परभणी तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यातच परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील नदी, नाले, विहीर, बोअर या जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावू लागली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील जलस्त्रोतांनी तळ गाठला. त्यातच दुधना, पूर्णा या नदीचे पात्रही कोरडेठाक पडले आहे. परिणामी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहीरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करुन शेतातील जलस्त्रोतातून पाणी आणावे लागत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातील पाणीटंचाई ओळखून तालुक्यातील किन्होळा, पिंपळगाव स.मि., आर्वी, काष्टगाव, पाथरा, नांदापूर, समसापूर, ब्रह्मपुरीतर्फे पेडगाव, वाडी दमई, पेडगाव, बाभूळगाव, गोविंदपूर, सारंगपूर, मोहपुरी, पिंपळा या गावांतील ग्रामपंचायतींनी पंचायत समिती कार्यालयाकडे १९ प्रस्ताव जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी दाखल केले होते. पंचायत समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. तहसील कार्यालयाने १९ प्रस्तावांपैकी ११ प्रस्तावांना मंजुरी देत विहीर व बोअरचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरु आहे. तर गोविंदपूर येथे टँकरने पाणी पुरवठ्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्यात लागत आहेत.
मंजुरीसाठी लागतोय : एक महिन्याचा कालावधी
परभणी तालुक्यातील १३१ गावांपैकी १४ गावांनी १९ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल केले; परंतु, प्रस्ताव मंजुरीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याचे दिसून येत आहे. किन्होळा येथील ग्रामपंचायतीने ५ नोव्हेंबर २०१८ रोजी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला; परंतु, त्यानंतर पंचायत समितीने १ डिसेंबर २०१८ रोजी आलेला प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल केला.
४तहसील कार्यालयाने २९ डिसेंबर २०१८ रोजी मंजुरी देऊन पाणीपुरवठा सुरु केला आहे. अशीच परिस्थिती इतर ११ गावांमधील आहे. त्यामुळे दुष्काळात सापडलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठीची होणारी भटकंती थांबविण्यासाठी पंचायत समिती व तहसील प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून जास्तीतजास्त आठ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करुन ग्रामस्थांना जलस्त्रोतांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
७ गावांतील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतींनी १९ जलस्त्रोतांच्या अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ११ प्रस्तावांना मंजुरी देत पाणीपुरवठाही सुरु करण्यात आला आहे; परंतु, ७ प्रस्ताव हे महिनाभरापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत तहसील कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे पेडगाव, मोहपुरी, पिंपळा या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन ग्रामस्थांना तात्काळ पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Status in Parbhani taluka: Acquisition of water sources in eleven villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.