ठळक मुद्देसहभागी झालेल्या शेतक-यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरुपाची वीज देयके देण्यात येत आहेत.सध्या जिल्ह्यातील ९२ हजार कृषीपंपधारकांकडे ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

परभणी : जिल्ह्यातील कृषीपंपाची थकबाकी असणा-या शेतक-यांसाठी महावितरणने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ अंमलात आणली आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरुपाची वीज देयके देण्यात येत आहेत. त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्प्त्यात भरावयाची आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. 

वीज वितरण कंपनीचे जिल्ह्यात ९२ हजार कृषीपंपधारक ग्राहक आहेत. या ग्राहकांना १० उपविभागांतर्गत महावितरणच्या वतीने वीज पुरवठा केला जातो.  या कृषीपंपधारक शेतक-यांना महावितरण महिन्याकाठी वीज बिल देते; परंतु, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. परिणामी महावितरणकडून आलेल्या वीज बिलाची परतफेड करु शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढला. सध्या जिल्ह्यातील ९२ हजार कृषीपंपधारकांकडे ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी शेतक-यांकडून वसूल करण्यासाठी ऊर्जा विभागाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ अंमलात आणली. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या एका वर्षात आपल्याकडे असलेली थकबाकीची रक्कम पाच हप्प्त्यात भरावी लागणार आहे. 

या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतक-यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरुपात वीज देयके देण्यात येत आहेत. या बिलात महावितरणच्या बोधचिन्हा शेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी २०१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजुस ग्राहक क्रमांक, ग्राहकांचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजुस १५ नोव्हेंबरपूर्वी शेतक-यांनी किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत  थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सुलभ झाले आहे.