Petrol bottles, books burned at Parbhani's Sangh's office; Hardest police settlement in the city | परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिस-या दिवशी परभणी  जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागातून आंबेडकरी विचा-यांच्या संघटनांचे कार्यकर्ते रॅलीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमले. दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेशनरोडवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव प्रेरणा या कार्यालयाच्या खिडकीतून काही अज्ञातांनी पेट्रोल असलेली बॉटल फेकून दिली.

परभणी : भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वयंसेवकांनी तातडीने आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिस-या दिवशी परभणी  जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. सोमवारी दुपारनंतर परभणी शहरातील बाजारपेठ बंद झाल्यानंतर मंगळवारी संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली. जवळपास १७ एस.टी.बसेसवर दगडफेक झाली. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान परभणी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद होती. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागातून आंबेडकरी विचा-यांच्या संघटनांचे कार्यकर्ते रॅलीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमले. यावेळी जवळपास दोन तास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगविला. यावेळी स्टेशनरोड परिसरात दगडफेक झाली.

दुपारी २ वाजेच्या सुमारास स्टेशनरोडवर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव प्रेरणा या कार्यालयाच्या खिडकीतून काही अज्ञातांनी पेट्रोल असलेली बॉटल फेकून दिली. यामुळे आतील काही पुस्तके व साहित्य जळाले. आतमधील उपस्थित स्वयंसेवकांनी तातडीने ही आग विझविली व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोेलीस निरीक्षक संजय हिबारे हे लवाजम्यासह दाखल झाले. तत्पूर्वीच आंदोलक येथून पसार झाले होते. ही घटना समजताच भाजपाच्या अनेक पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी या कार्यालयास भेटी दिल्या. दिवसभर या ठिकाणी पोेलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान, जिंतूररोडवर जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर वाहनांचे टायर जाळले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वसमतरोडवरील खानापूर फाटा परिसरात दगडफेक व दोन गटात हाणामारीची घटना घडली. या ठिकाणीही तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अ‍ॅड.अशोक सोनी यांच्या घरावर मंगळवार नंतर बुधवारीही दुपारी १ वाजेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. 

जिल्हाभरात कडकडीत बंद

राज्यस्तरावरुन पुकारण्यात आलेल्या बंद अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कडकडीत बंद दिसून आला. गंगाखेड, जिंतूर, सेलू येथेही बंद होता. मानवत, सेलू येथे सकाळी रास्तारोको करण्यात आला.


Web Title: Petrol bottles, books burned at Parbhani's Sangh's office; Hardest police settlement in the city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.