परभणीत हल्लाबोल मोर्चा : भारतीय राज्यघटना आली धोक्यात-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:03 AM2018-01-23T00:03:10+5:302018-01-23T00:03:33+5:30

आतापर्यंत सर्वसामान्य जनता न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेत होती; परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधिशच जनतेच्या न्यायालयात येऊन पत्रकार परिषद घेतात व न्यायालयांच्या कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे सांगतात, हे देशात अभूतपूर्व घडले आहे़ त्यामुळे भारतीय राज्यघटना या माध्यमातून धोक्यात आली असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़

Parbhaniat Attackball Morcha: Indian constitution has come under threat - Ajit Pawar | परभणीत हल्लाबोल मोर्चा : भारतीय राज्यघटना आली धोक्यात-अजित पवार

परभणीत हल्लाबोल मोर्चा : भारतीय राज्यघटना आली धोक्यात-अजित पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आतापर्यंत सर्वसामान्य जनता न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेत होती; परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधिशच जनतेच्या न्यायालयात येऊन पत्रकार परिषद घेतात व न्यायालयांच्या कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे सांगतात, हे देशात अभूतपूर्व घडले आहे़ त्यामुळे भारतीय राज्यघटना या माध्यमातून धोक्यात आली असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाडाभर हल्लाबोल संघर्षयात्रा काढण्यात आली आहे़ या अंतर्गत परभणीत सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आयोजित जाहीर सभेत अजित पवार बोलत होते़ व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विजय भांबळे, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ रामराव वडकुते, आ़ सतीश चव्हाण, आ़ विक्रम काळे, माजी आ़ प्रकाश सोळंके, माजी खा़ सुरेश जाधव, अ‍ॅड़ गणेश दुधगावकर, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी मंत्री फौजिया खान, शंकरआण्णा धोंडगे, सोनाली देशमुख आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केले़ राज्य सरकारनेही या घटनेची गांभिर्याने दखल घेतलेली नाही़ त्यामुळे देश पातळीवर हा प्रश्न चर्चेला गेला़ या प्रश्नावर पंतप्रधान का बोलत नाहीत? असा सवाल करीत ते म्हणाले की, सरकार समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे़ आतापर्यंत सर्वसामान्य जनता न्यायासाठी न्याय मंदिरात जात होती़; परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन न्याय व्यवस्थेत कशा पद्धतीने हस्तक्षेप चालू आहे, हे सांगितले़ त्यामुळे देशात अभूतपूर्व प्रसंग घडला़ हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी घातक असून, यामुळे भारतीय राज्यघटना धोक्यात आली आहे़, असेही ते म्हणाले़ नारायण राणे यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले राणे यांना मंत्रीपदाची भाजपाकडे सातत्याने मागणी करावी लागत आहे़ स्वत:च्या पक्षाच्या नावात स्वाभिमान असताना तोच स्वाभिमान त्यांनी मंत्रीपदासाठी गहाण ठेवला आहे़ मुंबईत शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक प्रत्येकी ५ कोटी रुपये देऊन फोडले़ तर दुसरीकडे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील आ़ हर्षवर्धन जाधव यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करीत त्यांनी ५ कोटी रुपये भाजपात प्रवेश करण्यासाठी देऊ केले होते़, शिवाय निवडून आणण्याचे आश्वासन दिले होते़ शिवसेनेचे ३० आमदार फोडण्यासाठी १५० कोटी रुपये देऊत, असेही सांगितले असल्याचा आरोप केला होता़ या आरोपाची चौकशी का केली गेली नाही़ भाजपा-शिवसेनेने हा काय पोरखेळ लावला आहे़ यांच्याकडे एवढे पैसे येतात तरी कोठून? असा सवालही त्यांनी केला़ परभणी-गंगाखेड रस्त्याला पंतप्रधानांचे नाव देऊनही तो दुरुस्त केला जात नाही़ या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे पळपुटे आहेत़ हिंमत असेल तर त्यांनी विकासाचे प्रश्न सोडून दाखवावेत, असेही ते म्हणाले़ परभणीतील शिवसेनेचे आमदार, खासदार दर महिन्याला आंदोलने करतात़ ही नौटंकी कशासाठी? तुमचेच सरकार आहे़ अधिकाºयांना कामे सांगा, जनतेची कामे करून घ्या, असेही ते म्हणाले़ यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे व आभार प्रदर्शन संतोष बोबडे यांनी केले़ तत्पूर्वी वसमत रोडवरील दत्तधामपासून सभास्थळापर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली़ दुसरीकडे महिलाही रॅलीने सभास्थळी दाखल झाल्या होत्या़ यावेळी बाळासाहेब जामकर, विजय जामकर, किरण सोनटक्के, गंगाधर जवंजाळ, राजेंद्र वडकर, मारोती बनसोडे, सुमीत परिहार, विष्णू नवले, सुमंत वाघ, इम्रान हुसैनी, रामेश्वर आवरगंड, जलालोद्दीन काजी, नंदाताई राठोड विठ्ठल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़
परभणीतील नेत्यांनी एकसंघ रहावे
हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने परभणीकर एकवटून येथे मोठ्या संख्येने जमले आहेत़ त्यामुळे परभणीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही एकसंघ रहावे, तरच पुढच्या वेळी परभणी लोकसभेचा खासदार राष्ट्रवादीचा राहील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले़ या संदर्भात भाषणाच्या शेवटी अजित पवार यांनीही परभणीच्या नेत्यांना आपसात एकोपा ठेवण्याचे आवाहन केले़
आता तहसीलदार पतंजलीची उत्पादने विकणार
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, राज्य शासनाने आपले सरकार या पोर्टलवर रामदेव बाबा यांच्या पतंजलीची उत्पादने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे़ पुढील काळात तुम्ही तहसीलदारांकडे उत्पन्नाचा किंवा कोणताही दाखला मागण्यास गेल्यास तहसीलदार, पतंजलीचे साबण, तेल, आवळा ज्यूस काढून दाखवितील व हे आपले सरकार केंद्रातून खरेदी करा, त्यानंतर दाखल मिळून जाईल, असे सांगतील़ त्यामुळे आता विचार करा आणि शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाºया या सरकारला सत्तेतून खेचा असे आवाहन त्यांनी केले़

Web Title: Parbhaniat Attackball Morcha: Indian constitution has come under threat - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.