परभणी :शेकडो गावांवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:36 PM2018-10-08T23:36:33+5:302018-10-08T23:37:43+5:30

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने व परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी राहिले आहे़ परिणामी या जलसाठ्यातून पिण्यासाठी पाणी घेणाऱ्या शेकडो गावांवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे़ या निमित्ताने दुष्काळाची चाहूल आताच जिल्ह्याला लागत असल्याचे दिसून येत आहे़

Parbhani: Water shortage crisis on hundreds of villages | परभणी :शेकडो गावांवर पाणीटंचाईचे संकट

परभणी :शेकडो गावांवर पाणीटंचाईचे संकट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने व परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी राहिले आहे़ परिणामी या जलसाठ्यातून पिण्यासाठी पाणी घेणाऱ्या शेकडो गावांवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे़ या निमित्ताने दुष्काळाची चाहूल आताच जिल्ह्याला लागत असल्याचे दिसून येत आहे़
परभणी जिल्ह्यात सरासरीच्या फक्त ६९ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामध्येही पावसात सातत्य राहिले नसल्याने जमिनीमध्ये पाणी मुरले नाही़ परिणामी जलसाठ्यांमध्ये म्हणावी तशी वाढ झालेली नाही़ नेहमी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान होत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटत असतो़ यावर्षी परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळाची चाहूल जिल्ह्याला आताच लागत आहे़ जिंतूर तालुक्यातील बारा गाव वस्सा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा होतो़ या धरणात ०़६२ दलघमी पाणीसाठा आरक्षित असते़ याशिवाय परभणी व पूर्णा तालुक्यातील एकूण ३९ हजार ५०१ लोकसंख्येच्या अनेक गावांना देखील सिद्धेश्वरमधूनच पाणीपुरवठा होतो़ यासाठी ०़५८ दलघमी पाणीसाठा येथे आरक्षित आहे़ उर्वरित पाणीसाठा हिंगोली जिल्ह्यासाठी या धरणात आरक्षित असताना या धरणात फक्त २२.५७ टक्के जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना भविष्य काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ येलदरी धरणातून परभणी, पूर्णा, वसमत या शहरांसाठी पिण्याचे पाणी दिले जाते़ यामध्ये परभणी शहराच्या ३ लाख ५९ हजार २५० लोकसंख्येसाठी वर्षभराकरीता २८़१० दलघमी पाण्याची मागणी नोंदविलेली आहे़ या शिवाय पूर्णा शहरासाठी १़९० दलघमी पाण्याचे आरक्षण वर्षभरासाठी करण्यात आले आहे़ या शिवाय २३ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील ४९ हजार ८६४ लोकसंख्येच्या विविध गावांना देखील येथून पाणीपुरवठा होत असतो़ शहर वगळता या गावांसाठी ०़७६ दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे; परंतु, धरणात सद्यस्थितीत फक्त ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे भविष्यात शहरांबरोबरच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता धूसर आहे़ परिणामी परभणी शहरासह इतर काही शहरांना पिण्याच्या पाण्याचे अन्य स्त्रोत शोधावे लागणार आहेत़
निम्न दुधना प्रकल्पात सद्या २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पातून सेलू, परतूर, मंठा आदी शहरांसह येलदरीतून पाणी नाही मिळाल्यास परभणीलाही पाणी पुरवठा केला जातो़ तसेच परभणी, सेलू व मानवत तालुक्यातील ८१ हजार ६८२ लोकसंख्येच्या विविध गावांसाठी ०़६८ दलघमी पाणीसाठा आरक्षित आहे़ त्यामुळे निम्न दूधना धरणही यावर्षी पाणीपुरवठा करण्यात मागे राहणार आहे़ पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाºयात सध्या १९ टक्के पाणीसाठा आहे़ येथे १९ हजार ३६५ लोकसंख्येच्या विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ०़२८ दलघमी पाणी आरक्षित आहे़ गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात सध्या २़३ टक्के जीवंत पाणीसाठा आहे़ या बंधाºयातून एकूण २३ हजार ४०० लोकसंख्येच्या विविध गावांना पाणी देण्यासाठी ०़३४ दलघमी पाणी आरक्षित आहे़ असे असले तरी या बंधाºयाला दरवाजेच नसल्यामुळे येथे पाणीच थांबत नाही़ परिणामी या बंधाºयातून पिण्यासाठी पाणी घेणाºया गावांची यावेळी पाण्यासाठी भटकंती होणार आहे़
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात सध्या ५४़६८ टक्के पाणी आहे़ असे असले तरी या बंधाºयातील बहुतांश पाणी हे नांदेड जिल्ह्यासाठीच आरक्षित आहे़ त्यामुळे त्याचा परभणीला फारसा फायदा होत नाही़ या बंधाºयातून २२ हजार ७०० लोकसंख्येच्या विविध गावांसाठी ०़३३ दलघमी पाणीसाठा आरक्षित आहे; परंतु, नांदेडकरांच्या सोयीमुळे या गावांचीही पाण्यासाठी भटकंती होणार आहे़ जिंतूर तालुक्यातील निवळी बंधाºयात सध्या काहीच पाणी नाही़ या बंधाºयातील पाण्यावर यापूर्वी १५ हजार ८०० लोकसंख्येची काही गावे अवलंबून होती़ त्यांच्यासाठी ०़२३ दलघमी पाणी आरक्षित होते़ आता या बंधाºयात मृतपाणीसाठा उपल्ध आहे. त्यामुळे भविष्यात येथील ग्रामस्थांचीही अडचण होणार आहे.
करपरा मध्यम प्रकल्पाच्या बंधाºयात सध्या ९़४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या बंधाºयातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या १६ गावांकरीता ०़७१ टक्के पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे़ गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात सध्या २३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, येथून तालुक्यातील १३ हजार ६०० लोकसंख्येच्या विविध गावांकरीता ०़२० दलघमी आणि पेडगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तीन गावांसाठी ०़३ दलघमी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे़ गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी तलावात सध्या ६२़५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ या तलावातून परिसरातील १० हजार ३०० लोकसंख्या असलेल्या विविध गावांना पाणीपुरवठा केला जातो़ सध्या या तलावात बºयापैकी पाणी असल्याने या गावांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे़ मानवत तालुक्यातील झरी तलावात सध्या जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसला तरी मृतसाठ्यातून मानवत शहराला पाणी दिले जात आहे. येथील पाण्यावर सात गावे अवलंबून होती, त्यांना आता पाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.
वरदान ठरलेले दुधना यावर्षी धोक्यात
पाणीटंचाईने नेहमीच त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील काही भागांसाठी निम्न दुधना प्रकल्प वरदान ठरले आहे़ नेहमी येलदरी धरणातून पाणी घेऊन घशाची कोरड भागविणाºया परभणी शहरवासियांना गेल्या काही वर्षांपासून येलदरी धरणच कोरडे राहत असल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे़ अशात निम्न दुधना प्रकल्प परभणी शहरासाठी वरदान ठरले़ गतवर्षी प्रकल्पात जवळपास ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ यावर्षी मात्र निम्न दुधनाच्या परिक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने या धरणातही म्हणावे तसे पाणी जमले नाही़ सद्यस्थितीत धरणात फक्त २३़४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ हे पाणी परभणीसह इतर काही शहरांनाही आवश्यक आहे़ शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही दुष्काळी स्थितीत येथून तहान भागवावी लागणार आहे़ त्यामुळे यावर्षी दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा अपुरा पडण्याची दाट शक्यता आहे़ परिणामी जिल्ह्याला टंचाईच्या झळा अधिक बसतील की काय, प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे़
आतापासूनच करावे लागणार नियोजन
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणी नाही़ त्यामुळे आहे ते पाणी वाचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे़ परभणी प्रमाणेच लातूर जिल्हाही पाणीटंचाईला सामोरे जात आहे़ तेथे सर्व प्रकल्पांमधील पाणी उपस्याला प्रशासनाने बंदी घातली आहे़ परभणीतही भविष्य काळात पाणीस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे लातूर प्रमाणेच प्रकल्पातील पाणी उपस्यावर बंदी घालण्याचा विचार प्रशासनाला करावा लागणार आहे़ त्यासाठीचे नियोजन आता तातडीने प्रशासनाला करावे लागणार आहे़ या पार्श्वभूमीवर मंगळवारी टंचाई उपाययोजनांबाबत जिल्हाकचेरीत अधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली आहे़ या बैठकीत पाणीटंचाईची चाहूल लक्षात घेऊन प्रशासनाला निर्णय घ्यावे लागणार आहेत़

Web Title: Parbhani: Water shortage crisis on hundreds of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.