परभणी : विधानपरिषदेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:57 PM2018-05-20T23:57:19+5:302018-05-20T23:57:19+5:30

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी २१ मे रोजी दोन्ही जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या मतदार संघात तीन उमेदवार असून, सोमवारी सायंकाळपर्यंत या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.

Parbhani: Today's poll for the Legislative Council | परभणी : विधानपरिषदेसाठी आज मतदान

परभणी : विधानपरिषदेसाठी आज मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी २१ मे रोजी दोन्ही जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या मतदार संघात तीन उमेदवार असून, सोमवारी सायंकाळपर्यंत या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून एक सदस्य निवडून द्यावयाचा आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीकडून विप्लव बाजेरिया, काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख आणि अपक्ष सुरेश नागरे असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून एक सदस्य निवडून दिला जाणार असल्याने उमेदवारांनी प्रचाराच्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांशी जवळकीता वाढविली होतीे. एकूण ५०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीत सोमवारी मतदान प्रक्रिया घेतली जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाने रविवारीच मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास मतदानासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर दुपारी मतपेट्या आणि साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. सायंकाळनंतर मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आले.
राजकीय घडामोडींनी गाजला दिवस
परभणी : विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असल्याने रविवारी सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी परभणी जिल्ह्यात बैठका घेतल्याने रविवारचा दिवस राजकीय घडामोडींचा ठरला. सकाळपासूनच या बैठकांना सुरुवात झाल्याने निवडणुकीच्या पूर्व संध्येला चांगलीच खलबते झाली.
काँग्रेस आघाडीच्या काही नगरसेवक, कार्यकर्त्यांची बैठक रविवारी सकाळी पाथरी येथे पार पडली. या बैठकीस आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, भरत घनदाट, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, सभापती अशोक काकडे यांची उपस्थिती होती. साधारणत: एक ते दीड तास या बैठकीत चर्चा झडली.
या बैठकीनंतर दुपारी परभणी शहरातही काँग्रेस आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी नांदेड येथून माजीमंत्री आ. डी.पी. सावंत, आ.अमर राजूरकर यांनी काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. परभणी जिल्ह्यात दिवसभर बैठकांचे सत्र सुरु असल्याने मतदार मात्र संभ्रमात असल्याचे दिसून आले.
परभणीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची बैठक होत असतानाच सेलू येथेही शिवसेना-भाजप युतीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यमंत्री अर्जून खोतकर, खा.बंडू जाधव, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ.हरिभाऊ लहाने, आ.गोपीकिशन बाजोरिया, उमेदवार विप्लव बाजोरिया यांचीही बैठकीस उपस्थिती होती.
एकंदर दिवसभर जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरु होते. या बैठकांमधील निर्णय, चर्चा बाहेर येत नसली तरी दिवसभर वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. नाराज मतदार मंडळींची मनधरणी करणे, मतदारांची जुळवाजुळव करणे, या अनुषंगाने झालेल्या या बैठकांमुळे रविवारचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजला.
सात केंद्रांवर होणार मतदान
परभणी जिल्ह्यातील चार आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ अशा सात मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.
परभणी मनपा सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य अशा १३३ मतदारांसाठी परभणी येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र स्थापन केले आहे. त्याचप्रमाणे सेलू व जिंतूर नगरपालिकेच्या ५४ सदस्यांसाठी सेलू तहसील कार्यालयात मतदान होईल.
गंगाखेड, पूर्णा नगरपालिका आणि पालम नगरपंचायतीच्या एकूण ७० सदस्यांसाठी गंगाखेड तहसील कार्यालयात आणि पाथरी, मानवत आणि सोनपेठ नगरपालिकेच्या ६५ सदस्यांसाठी तहसील कार्यालय पाथरी येथे मतदान होईल.
हिंगोली जिल्हा परिषद, हिंगोली नगरपालिका आणि सेनगाव नगरपंचायतीच्या १०९ सदस्यांसाठी तहसील कार्यालय हिंगोली येथे, कळमनुरी नगरपालिकेच्या १९ सदस्यांसाठी कळमनुरी तहसील कार्यालयात मतदान होईल.
वसमत नगरपालिका व औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या ५१ सदस्यांसाठी वसमत येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त
परभणी- विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त सोमवारी होणाºया मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चार मतदान केंद्र आहेत. परभणी येथील मतदान केंद्रावर १ उपविभागील पोलीस अधिकारी, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि १२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेलू येथील मतदान केंद्रावर १ उपविभागीय पोलीस अधिकारी, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ उपनिरीक्षक आणि २२ कर्मचारी, गंगाखेड येथे १ उपविभागीय पोलीस अधिकारी, दोन उपनिरीक्षक आणि २२ कर्मचारी तर पाथरी येथील केंद्रावर १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १० पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त लावला आहे. त्याचप्रमाणे शीघ्रकृतीदलाच्या दोन तुकड्या तैनात ठेवल्या असून त्यात दोन अधिकारी आणि १२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
६२ अधिकारी पार पाडणार प्रक्रिया
सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान घेतले जात आहे. यासाठी ७ क्षेत्रिय अधिकारी, ७ मतदान केंद्राध्यक्ष, १८ मतदान अधिकारी, ९ सुक्ष्म निरीक्षक, ७ शिपाई आणि मतदारांची ओळख पटविण्यासाठी १४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
अशी आहे मतदानाची प्रक्रिया
विधान परिषदेसाठी बॅलेट पेपरच्या साह्याने मतदान घेतले जाणार आहे. मतदानासाठी जांभळ्या शाईचा स्केच पेन वापरावा लागेल. निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना या स्केच पेनच्या साह्याने पसंती क्रमांक द्यावयाचा आहे. प्रथम पसंतीसाठी निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा अंक लिहून मतदान करावयाचे असून, त्यानंतर उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या पसंतीनुसार २, ३, ४ असे अंक लिहून मतदान करावयाचे आहे. एका उमेदवाराला केवळ एकच पसंती क्रमांक देता येणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Parbhani: Today's poll for the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.