परभणी : तंटामुक्त गाव समित्या कागदावरच राहिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:29 AM2019-04-27T00:29:28+5:302019-04-27T00:31:12+5:30

गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचे दिसून येत आहे.

Parbhani: Tantamukta village councils remain on paper | परभणी : तंटामुक्त गाव समित्या कागदावरच राहिल्या

परभणी : तंटामुक्त गाव समित्या कागदावरच राहिल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेकडून समृद्धीकडे जावे, या हेतुने शासनाने तंटामुक्त समित्याची स्थापना केली. मात्र तालुक्यातील विविध गावात झालेली भांडणं, तंटे मिटवण्यासाठी या समितीला अपयश येत असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे दार ठोठवावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांवरील कामाचा वाढता ताण कमी व्हावा, गावातील तंटे गावाताच मिटावेत, हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पुढाकारातुन राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु करण्यात आली. या समित्यांचे अधिकार कोणते, तंटे कसे मिटवावेत, ग्रामस्थ पोलिसांकडे न जाता समितीकडे कसे येतील, याबाबत समितीचे पदधिकारी सध्याही अज्ञभिज्ञ आहेत. समितींच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची परिपूर्ण जाणीव नसल्याने बहुतांश गावातील तंट्यांच्या तक्रारी ठाण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर सभेचे आयोजन करुन जनजागृती करणे आवश्यक आहे; परंतु, तसे होताना दिसत नाही. गावातील वाद पोलीस ठाण्यात आला की, अनेकजण याचा गैर फायदा घेतात. शासनाच्या या चांगल्या योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी होताना दिसत नाही. गावातील तंटे गावातच मिटविल्यास त्या गावाला शासनाकडून लाखो रुपयांची बक्षिसेही दिली जातात. समितीचे पदधिकारी बक्षीस आपल्याच गावाला मिळावे, यासाठी धडपड करतात. मात्र गावातील तंटे मिटवताना दिसत नाहीत. गावातल्या गावात अबोला नको म्हणून गावच्या समितीतील पदधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे तंटामुक्त समितीना तंटा मिटवण्यासाठी मानवत तालुक्यात अपयश येत आहे.
वरिष्ठांचे दुर्लक्ष: तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावली
गावातील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला सुरुवातीला प्रतिसादही मिळाला; परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मानवत तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावली असून गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदांवरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतीमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून पोलिस प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागते. यात वेळ, पैसा, मानसिक स्वास्थ गमवण्याची वेळ येते.
४यास दारू हे एक कारण आहे. त्यामुळे दारूचे समूळ उच्चाटन व्हावे, गावा-गावांत शांतता नांदावी, यासाठी दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी २००६ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर काही वर्षे ती प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र आता जिल्ह्यासह तालुक्यात ही मोहीम थंडावल्याचे दिसून येत आहे.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
तंटामुक्ती मोहिमेकडेच पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तंटे वाढत असून तंटामुक्त समिती अध्यक्ष व समित्याही याबाबत उदासीन आहेत. खºया अर्थाने आदर्श गावाची निर्मिती करावयाची असेल तर राज्यशासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा तंटामुक्त चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. यामुळे गाव परिसरात वाद, गावातच मिटू शकतील. ज्यामुळे शासनाचा या योजनेमागचा उद्देश सफल होईल.

Web Title: Parbhani: Tantamukta village councils remain on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.