परभणी : मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने पालकांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:13 AM2018-06-20T00:13:45+5:302018-06-20T00:13:45+5:30

परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची गर्दी झाली़ या सर्व अफवांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ त्यातच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मारहाणीसारखे प्रकार होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़

Parbhani: The spread of rumors of the children spread to parents | परभणी : मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने पालकांची उडाली झोप

परभणी : मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने पालकांची उडाली झोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची गर्दी झाली़ या सर्व अफवांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ त्यातच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मारहाणीसारखे प्रकार होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ही अफवा पसरली आहे़ मुलांना पळवून नेण्याची घटना घडली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पेव फुटले आहे़ परभणी शहरात देखील मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत़ मुलांना पळविणारी टोळी जिल्ह्यात दाखल झाली आहे़ अशा स्वरुपाची ही अफवा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़
या भीतीतूनच सोमवारी रात्री शहरातील दर्गा रोड परिसरातील झमझम कॉलनीत नागरिकांनी रात्र जागून काढली़ दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयावरून एका व्यक्तीस मारहाण झाल्याची घटनाही याच भागात घडली़ शहरात अफवा पसरल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ होत आहे़ ठिकठिकाणी गस्त घालून जनजागृती केली जात आहे़
विद्यार्थ्यांना शाळेतून आणले घरी
सोनपेठ तालुक्यात अशीच अफवा पसरली असून, मंगळवारी या अफवेमुळे शाळांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती़ पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे़ १९ जून रोजी सोनखेड परिसरातून एक मुलगा पळविल्याची अफवा शहरात पसरली़
लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे संदेश सोशयल मीडियातून फिरत आहेत़ अनोळखी व्यक्ती आढळली तर तातडीने पोलिसांना माहिती द्यावी़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पो.नि .सोपान सिरसाठ यांनी केले आहे़
जिंतुरात फिरस्त्यांची चौकशी
जिंतूर तालुक्यातही ही अफवा पसरली आहे़ अनेक जण या अफवेच्या अनुषंगाने पोलिसांना माहिती देत आहेत़ अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़
त्याचबरोबर छोट्या व्यवसायासाठी बाहेर गावाहून शहरात आलेल्या फिरस्त्यांची चौकशी जिंतूर पोलिसांनी केली़ उपविभागीय अधिकारी अनिल घेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुरेश नरवडे यांनी पथकामार्फत शहरात भटक्या नागरिकांची तपासणी केली़
अशोक घोरबांड यांची होर्डिंग लावून जनजागृती
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी बसस्थानक, जांब नाका, आझम चौक आणि पारवा गेट अशा चार ठिकाणी मोठे होर्डिंग लावून नागरिकांना आवाहन केले आहे़ फिरस्ती, भिकारी, वेडसर, अनोळखी व्यक्तींना मारहाण करू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, संशयास्पद व्यक्ती आढळली तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे़
अफवांवर विश्वास ठेवू नका- परदेशी
अफवांच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासणी केली़ मात्र कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही़ ही केवळ अफवा आहे़ सर्व फिरस्ती लोकांच्या चौकशीचे कामही सुरू आहे़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डीवायएसपी संजय परदेशी यांनी केले आहे़ तसेच संशय आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा पोलीस नियंत्रण कक्ष ०२४५२-२२६२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे़

Web Title: Parbhani: The spread of rumors of the children spread to parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.