परभणी : जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:21 AM2018-11-15T00:21:46+5:302018-11-15T00:22:14+5:30

शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या उपांगांच्या कामांना गती देण्यात आली असून, धर्मापुरी येथे उभारल्या जाणाºया जलशुद्धीकरण केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित कामेही सुरू असून, मे महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवले आहे़ ही योजना मे महिन्यात कार्यान्वित झाल्यास परभणी शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो़

Parbhani: The speed at the work of water purification project | परभणी : जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला वेग

परभणी : जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला वेग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणाऱ्या उपांगांच्या कामांना गती देण्यात आली असून, धर्मापुरी येथे उभारल्या जाणाºया जलशुद्धीकरण केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित कामेही सुरू असून, मे महिन्यापर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवले आहे़ ही योजना मे महिन्यात कार्यान्वित झाल्यास परभणी शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो़
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतून परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजना २००८ मध्ये मंजूर झाली होती़ मात्र या योजनेचे काम संथगतीने झाले़ योजनेचे दोन टप्पे करण्यात आले़ आता या दोन्ही टप्प्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे अमृत योजनेंतर्गत केली जात आहेत़ त्यासाठी महापालिकेला १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील जलवाहिनी, जलकुंभ अशी कामे हाती घेण्यात आली आहेत़ परभणी-जिंतूर रस्त्यावर धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे़ या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, या केंद्राचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़ या ठिकाणी सध्या २ क्लॅरीफोकूलेटर उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे़ येलदरी येथून निघालेले पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर त्यातील गाळ वेगळा करणे, क्लोरीनेशन करणे आणि शुद्धीकरण करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यात जलशुद्धीकरण प्रक्रिया होते़ ही कामे आता गतीने केली जात आहेत़ याच ठिकाणी एक संप वेल उभारण्यात येणार असून, त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे़
शुद्धीकरण प्रकल्पातून बाहेर पडलेले पाणी या संपवेलमध्ये साठविले जाते़ हे काम हाती घेण्यात आले असून, संपवेल पासून ते परभणी शहरातील खाजा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या एमबीआरपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी मार्कआऊटच्या कामालाही बुधवारी सुरुवात करण्यात आली आहे़ तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पस्थळी रॅपिड सँड फिल्ट्रेशन ही शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारी यंत्रणाही उभारणीचे काम सुरू आहे़
सध्या या यंत्रणेअंतर्गत व्हॉल्व्ह बसविले जात आहेत़ जलशुद्धीकरण प्रकल्पापासून निघालेले पाणी खाजा कॉलनी येथील एमबीआरपर्यंत पोहचते करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही सुरुवात होत असून, मे महिन्यापर्यंत संपूर्ण योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ अमृत योजनेंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षातील डिसेंबर महिन्यापर्यंतची मुदत आहे़ मात्र सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता मे महिन्यातच ही योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत़
योजना झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत
परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जात आहे़ एक वर्षासाठी परभणी शहराला ८ दलघमी पाणी लागते़ यावर्षी सर्वच प्रकल्पांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने शहरासाठी सिद्धेश्वर आणि निम्न दूधना प्रकल्पात पाणी आरक्षित करण्यात आले आहे़
परभणी शहरासाठी हे पाणी नदीपात्रातून बंधाºयात येते़ त्यामुळे ८ दलघमीसाठी तब्बल ३० दलघमी पाणी दोन्ही प्रकल्पांमध्ये आरक्षित करावे लागले आहे़ पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले तर थेट येलदरी येथून जलवाहिनीच्या सहाय्याने ८ दलघमी पाणी शहरात पोहचू शकते़
त्यामुळे उर्वरित २२ दलघमी पाण्याची बचत दरवर्षी होवू शकते़ महापालिकेच्या नियोजनाप्रमाणे मे महिन्यात ही योजना कार्यान्वित झाली तर शहराला लागणारे ८ दलघमी पाणीच प्रकल्पांमधून उचलले जाईल़ परिणामी उर्वरित पाणी इतर योजनांसाठी वापरणे सोयीचे होणार आहे़
४गुरुत्वाकर्षणाने येणार पाणी
युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत दोन टप्प्यांमध्ये कामे करण्यात आली आहेत़ ही कामे जवळपास पूर्ण झाली असून, त्यात पहिल्या टप्प्यामध्ये येलदरी येथे उद्भव विहीर उभारण्यात आली आहे़ येलदरीपासून काही अंतरावर रायझिंग मेन आणि त्यापासून काही अंतरावर १ कोटी २५ लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचा ब्रॅकेट पॉर्इंट टर्मिनेटर (बीपीटी) उभारण्यात आला आहे़ हे तिन्ही कामे टप्पा १ मधील असून, टप्पा २ मध्ये बीपीटीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी अंथरण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ विशेष म्हणजे बीपीटीपासून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने पाणी धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहचणार आहे़ पुढील आठवड्यात त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे़ पाणीपुरवठा योजनेसाठी येलदरी येथे वीज वितरण कंपनीच्या केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून, जोडणीचे कामही येत्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली़
७० किमीची जलवाहिनी पूर्ण
४अमृत योजनेंतर्गत परभणी शहरामध्ये १७३ किमी अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यात आतापर्यंत ७० किमी अंतराची जलवाहिनी टाकली असून, उर्वरित कामेही टप्प्या टप्प्याने केली जात आहेत़ शहराच्या वेगवेगळ्या भागात सहा जलकुंभ उभारण्यात आले असून, या जलकुंभाचे कामही स्लॅबलेव्हलपर्यंत पोहचले आहे़ अंतर्गत जलवाहिनी आणि जलकुंभाची कामेही सध्या सुरू करण्यात आली आहेत़

Web Title: Parbhani: The speed at the work of water purification project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.