Parbhani: slander on Facebook; Crime against accused | परभणी :फेसबुकवरून बदनामी; आरोपीविरूद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): एका महिलेचे लग्नापूर्वीचे फोटो फेसबुकवर टाकून त्याखाली अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़
या संदर्भात पीडित विवाहितेने गंगाखेड ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पीडिता इसाद येथे शिक्षण घेत असताना सिद्धेश्वर नागरगोजे याच्यासोबत मैत्री झाली़ सिद्धेश्वर हा माझ्यासोबत लग्न कर असे नेहमी म्हणत होता़ मात्र घरच्यांचा विरोध असल्याने मी नकार दिला़ माझ्या शिक्षणानंतर माझे लग्नही झाले़ याच दरम्यान, आरोपी सिद्धेश्वर नागरगोजे याने सतत धमक्या दिल्या़ तसेच माझी बहीण, मामा आणि पतीच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून लग्नापूर्वी काढलेले माझे फोटो पाठविले़ एवढ्यावरच न थांबता फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून त्यावर हे फोटो टाकले व माझी बदनामी केली, अशी तक्रार दिली़ त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक सोहन माछरे तपास करीत आहेत़