परभणी: प्रश्नपत्रिका फोडणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:33 AM2018-03-17T00:33:15+5:302018-03-17T00:33:15+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडून त्या व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सक्रिय झाले असून यामधून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाला याची तसूभरही खबर लागलेली नाही.

Parbhani: Questionbank racket activated in the district | परभणी: प्रश्नपत्रिका फोडणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय

परभणी: प्रश्नपत्रिका फोडणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडून त्या व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सक्रिय झाले असून यामधून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाला याची तसूभरही खबर लागलेली नाही.
दहावीच्या परीक्षांना १ मार्चपासून जिल्हाभरात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर ३१ हजार ८८९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरु असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी दिले होते. त्याअनुषंगाने २८ फेब्रुवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील परीक्षा केंद्राचे स्टिंग आॅपरेशन करुन कॉप्यांचा बाजार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर १४ मार्च रोजी दहावीच्या परीक्षेतील विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटून तो व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे वृत्त १५ मार्च रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली व त्यात गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या केंद्रावरुन हा पेपर फुटल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या वतीने पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.आर.कुंडगीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दहावीचे पेपर फोडून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल करुन त्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तूळात गेल्या १५ दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे मराठी विषयापासून सुरु झालेला व्हायरलचा हा प्रकार १४ मार्च रोजी ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता व्हॉटस्अ‍ॅपवर पेपर व्हायरल होत असल्याची माहिती शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना काही जागरुक नागरिकांनी यापुर्वीच दिली होती; परंतु, या अधिकाºयांनी केवळ बघ्याची भूमिका घेत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे या जागरुक नागरिकांपैकी काहींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे कोणत्या ग्रुपवर हे पेपर व्हायरल झाले, किती वाजता व्हायरल झाले, या संदर्भातील व्हॉटस्अ‍ॅपचा स्क्रिनशॉटही शिक्षण विभागातील अधिकाºयांना उपलब्ध करुन देण्यात आला होता. तरीही या अधिकाºयांनी कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. शिवाय संबंधित तक्रारकर्त्या नागरिकांनाही कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिक्षेपूर्वीच पेपर फुटत असल्याची माहीत असूनही हे अधिकारी का गप्प बसले होते? असा सवाल आता शिक्षणप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाºयांमार्फत चौकशी केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटमध्ये कोणते अधिकारी किंवा कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती, शिक्षक सहभागी आहेत, यासंदर्भातील माहिती उजेडात येणार आहे. शिक्षण विभाग ही बाब कितपत गांभीर्याने घेतो, याकडेही संपूर्ण शिक्षण वर्तूळाचे लक्ष लागले आहे.
परजिल्ह्यातून विद्यार्थी परभणी जिल्ह्यात
परभणी जिल्ह्यात कॉप्या करण्यासाठी चांगले वातावरण असल्याची चर्चा इतर जिल्ह्यात गेल्याने परभणी जिल्ह्यातील केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी बीड, हिंगोली, नांदेड आदी परजिल्ह्यातून काही विद्यार्थी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे गतवर्षीच काही शाळांमध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यात आले, ते केवळ कॉप्यांचा उद्देश साध्य करण्याच्या हेतुनेच असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे याबाबीची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
गतवर्षी जालना येथे बारावीच्या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी जवळपास ४० जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास तेथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केला होता. या पथकाच्या चौकशीत एक आरोपी परभणी जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या आरोपीला जालना पोलिसांनी अटकही केली होती; परंतु पुढे हे प्रकरण शांत झाले. बुधवारच्या पेपरफुटीनंतर गतवर्षीच्या या घटेनचा काही शिक्षणप्रेमींनी दाखला दिला. त्यामुळे शिक्षण विभागाला पेपरफुटीचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे लागणार आहे.

Web Title: Parbhani: Questionbank racket activated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.