Parbhani: The last house to the branches of the Polytechnic | परभणी: तंत्रनिकेतनच्या शाखांना अखेरची घरघर
परभणी: तंत्रनिकेतनच्या शाखांना अखेरची घरघर

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनुविद्युत व उपकरणीकरण शाखेला विद्यार्थीच नसल्याने या शाखा बंद पडतात की काय? ंअसे वाटत आहे. हे जिंतूरचे वैभव वाचविण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे.
जिंतूर शहराला शासकीय तंत्रनिकेतनमुळे नावलौकिक मिळाला आहे. एकेकाळी पुणे, मुंबई येथून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते. कालांतराने या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व विविध सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थी संख्या रोडावली होती; परंतु, मागील दोन ते तीन वषार्पासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर असल्याने महाविद्यालय फुलून गेले होते. यावर्षी मात्र महाविद्यालयाला अखेरची घरघर लागली आहे. महाविद्यालयामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, अनुविद्युत अभियांत्रिकी, उपकरणीकरण अभियांत्रिकी या शाखा आहेत. प्रत्येक शाखेत ६० विद्यार्थी क्षमता आहे. यावर्षी तर अनेक शाखांमध्ये विद्यार्थीच नाहीत. उपकरणीकरण अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षाला केवळएका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. द्वितीय वर्षाला ८ विद्यार्थी व तृतीय वर्षाला १५ विद्यार्थी आहेत. पुढील वर्षीही शाखा चालू राहते की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत अभियांत्रिकीमध्ये तर प्रथम वर्षाला विद्यार्थीच नाहीत. द्वितीय वर्षात ८ विद्यार्थी आहेत.
संगणक अभियांत्रिकीकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या वर्षी प्रथम वर्षाला १४ विद्यार्थी, द्वितीय वर्षाला १४ विद्यार्थी, तृतीय वर्षाला ३३ विद्यार्थी आहेत. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थी कमी होताना दिसत आहेत. यंत्र अभियांत्रिकी शाखेमध्ये जेमतेम विद्याथी ७ असून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रथम वर्षाला केवळ २६ विद्यार्थी आहेत. तर द्वितीय वर्षात ४० विद्यार्थी संख्या आहे.
भविष्यामध्ये उपकरणीकरण शाखा, अनुविद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या शाखा बंद पडतात की काय? याबाबत संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांमध्ये मागील तीन वषार्पासून सर्व विषयाचे प्राध्यापक व तज्ञ असतानासुद्धा विद्यार्थी इकडे फिरकत नसल्याने शासकीय तंत्रनिकेतनचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी जिंतूरकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
नोकरीच्या संधी कमी
एकेकाळी शासकीय तंत्रनिकेतनमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत होती; परंतु, मागील चार ते पाच वर्षांपासून नोकरीच्या संधी कमी झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये येणाऱ्या विद्यार्र्थ्यांची संख्या रोडावली आहे. विशेषत: संगणक अभियांत्रिकी शाखेला विद्यार्थी मिळत नाहीत. यावरून बेरोजगारी या क्षेत्रात किती प्रचंड आहे? हे दिसते.

सद्य स्थितीत अनुविद्युत उपकरणीकरण शाखेस विद्यार्थ्यांचा कल कमी दिसते; परंतु, वाढते औद्योगिकरण व संगणकीय व्यवस्थेसाठीच दोन्ही शाखा महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे जिंतूर येथे जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या ठिकाणी शासनाच्या सर्व सुविधा मिळतात. गरजू विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.
-डॉ. के.बी. लाढाणे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन


Web Title: Parbhani: The last house to the branches of the Polytechnic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.