परभणी: कडबा शेकडा चार हजारांवर पोहचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:09 AM2019-03-16T00:09:00+5:302019-03-16T00:09:44+5:30

जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत असून यावर्षी माणसांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात ओला चारा संपल्याने कडब्याला मागणी वाढली असून कडब्याचे भाव चार हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी महागामोलाचा चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत.

Parbhani: Kadaba reached four thousand | परभणी: कडबा शेकडा चार हजारांवर पोहचला

परभणी: कडबा शेकडा चार हजारांवर पोहचला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत असून यावर्षी माणसांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात ओला चारा संपल्याने कडब्याला मागणी वाढली असून कडब्याचे भाव चार हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी महागामोलाचा चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत.
यंदा पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला आणि विशेष म्हणजे परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवल्या. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो; परंतु, यावर्षी पावसाअभावी नोव्हेंबरपासूनच जिल्हावासियांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ओला चारा शिल्लक नसल्याने यावर्षी जनावरांची उपासमार होत आहे. गावोगावचे बाजार जनावरांनी फुलत असले तरी या बाजारपेठेत व्यापारी अधिक आणि ग्राहक कमी अशी परिस्थिती मागील दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे.
गुरुवारी जिल्ह्याचा जनावरांचा बाजार भरतो. या बाजारपेठेत जनावरांबरोबरच चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. येथील खंडोबा बाजार भागात भरणाºया जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात चारा विक्रीसाठी आल्याचे पहावयास मिळाले. दररोज या ठिकाणी जिल्ह्यातील विक्रेते चाºयाची विक्री करतात.
कडबा, ओला चारा, ऊस, वाढे असे चाºयाचे प्रकार विक्रीसाठी दाखल झाले आहेत; परंतु, सर्वच चाºयाचे भाव जवळपास दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे चारा उपलब्ध असला तरी जनावरांना देताना पशूपालकांना पैशांचाही ताळमेळ लावावा लागत आहे.
कडबा सर्वसाधारणपणे १८०० ते २ हजार रुपये शेकडा या दराने विक्री होतो. मात्र बाजारपेठेत कडब्याचे भाव ३८०० ते ४ हजार रुपये शेकड्यापर्यंत पोहचले आहेत. परभणीच्या बाजारपेठेत जवळपास ५ हजार कडबा दररोज विक्रीसाठी येत असला तरी त्यातील केवळ १ हजार कडब्याचीच विक्री होत आहे. भाववाढीमुळे पशूपालक त्रस्त आहेत. कडब्याबरोबरच उसाचे कांडे २ हजार ६०० रुपये शेकडा या दराने विक्री होत आहे.
उसाच्या कांड्यांचेही भाव सरासरी ६०० रुपयांनी वाढले आहेत. तसेच ५०० रुपये शेकडा दराने वाढ्यांची विक्री होत आहे. मक्याच्या हिरव्या पेंड्या येथील बाजारपेठेत विक्री होत असून २० रुपयांना एक पेंडी दिली जात आहे. मक्याचा ओला चारा उपलब्ध असला तरी पशूपालकांकडून या चाºयाला मागणी कमी आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये चारा विक्रीसाठी दाखल होत असला तरी भाववाढ झाल्याने हा चारा खरेदी करण्यासाठी पशूपालक आखडता हात घेत आहेत.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक टंचाईचा सामना करणारे शेतकरी चाºयाचे भाव दुप्पटीने वाढल्याने आणखीच अडचणीत सापडले आहेत. दिवसभरामध्ये २५ टक्के चाºयाचीही विक्री होत नसल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले.
जनावरांची विक्रीही मंदावली
बाजारात नांदेड, मानवत, सेलू, परतूर, गंगाखेड, वसमत, हिंगोली आदी भागातून व्यापारी जनावरांच्या विक्रीसाठी येतात. प्रत्येक बाजाराच्या दिवशी ५०० ते ६०० जनावरे विक्रीसाठी दाखल होत आहेत. दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील जनावरांची संख्या दुप्टीने वाढली आहे; परंतु, ग्राहक नसल्याने विक्री मंदावली आहे. त्यामुळे जनावरांचे भावही कमी झाले आहेत. गुरुवारी या बाजारपेठेत बैल, म्हैस, गोºहे, शेळ्या अशी जनावरे विक्रीसाठी आल्याचे पहावयास मिळाले.

या बाजारपेठेत १५ वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. यावर्षी चारा टंचाईमुळे भाव वाढले आहेत. कडबा २८०० ते ३ हजार रुपये शेकडा विक्री होत आहे; परंतु, उसाचे वाढे बाजारपेठेत दाखल झाल्यामुळे कडब्याला मागणी नाही. अशीच परिस्थिती राहिली तर कडबा, ओला चारा आणि वाढ्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-शेरखान अनवर खान, विक्रेता
जनावरांच्या बाजारात ५०० ते ६०० जनावरे विक्रीसाठी येत असली तरी दाखले मात्र २०० ते २५० एवढेच होत आहेत. खरेदीदारांची संख्या रोडावल्याने दाखले कमी होत आहेत.
-सय्यद हारुण स. मुसा, बिल कलेक्टर, मनपा

Web Title: Parbhani: Kadaba reached four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.