परभणी ; शहापूरच्या ‘जलयुक्त’ कामात अनियमितताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:22 AM2019-06-26T00:22:33+5:302019-06-26T00:23:14+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील शहापूर येथे करण्यात आलेल्या दोन सिमेंट नाला बांधाच्या २२ लाख ९४ हजार ९११ रुपयांच्या कामात फसवणूक केल्या प्रकरणी सदरील कामाच्या कंत्राटदारावर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़; परंतु, या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर मात्र कुठलीही कार्यवाही झालेली नाही़

Parbhani; The irregularities in 'Jalukta' work of Shahapur | परभणी ; शहापूरच्या ‘जलयुक्त’ कामात अनियमितताच

परभणी ; शहापूरच्या ‘जलयुक्त’ कामात अनियमितताच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील शहापूर येथे करण्यात आलेल्या दोन सिमेंट नाला बांधाच्या २२ लाख ९४ हजार ९११ रुपयांच्या कामात फसवणूक केल्या प्रकरणी सदरील कामाच्या कंत्राटदारावर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़; परंतु, या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर मात्र कुठलीही कार्यवाही झालेली नाही़
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत काही ठिकाणी चांगली कामे झाली आहेत तर काही ठिकाणी कामाच्या निकृष्टतेने कळस गाठल्याची प्रकरणे समोर आली आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील शहापूर, कारेगाव येथील सिमेंट नाला बांधाच्या कामाचा समावेश आहे़ कारेगाव व शहापूर येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये २३ लाख १७ हजार ६२४ रुपयांचा निधी सिमेंट नाला बांधासाठी मंजूर करण्यात आला़ त्यानंतर जालना येथील लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत हे काम परभणी येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले़ सदरील कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले; परंतु, या कामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे काही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़
त्यामध्ये कामासंदर्भातील गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या होत्या़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी या संदर्भात आदेश काढून ५ सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती़ त्यानंतर रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भारतकुमार कानिंदे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोणगुते व अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी या चार सदस्यांच्या पथकाने ९ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, या सिमेंट नाला बांधाचे निकृष्ट काम चव्हाट्यावर आले़ सदरील कंत्राटदाराने या बांधाचा पाया भरताना सिमेंटचा वापर करणे आवश्यक होते; परंतु, चक्क दगड आणि वाळुचे पोते त्यामध्ये टाकून त्यावर बांध उभारण्यात आल्याचे दिसून आले़
शिवाय या बांधाची उंची पुरेशी ठेवली गेली नाही़ कामात निकृष्ट साहित्य वापरल्याचे दिसून आले. तसेच सदरील सिमेंट नाला बांधाचे खोलीकरणही व्यवस्थित झालेले नाही़ प्रशासनाने दिलेल्या निकषानुसार हे काम आढळले नाही़ त्यामुळे या बांधामध्ये फारसे पाणीही जमा होणार नाही, हे पथकाच्या प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले़ त्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला़ जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जलसंधारण विभागाला दिले होते़ त्यानुसार जलसंधारण अधिकारी किशोर जेरूरकर यांनी या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात १५ जून रोजी फिर्याद दिली़ त्यामध्ये कुरेशी मोहम्मद फैय्याज अहमद (परभणी) यांना ०़९८ टक्के कमी दराने हे काम देण्यात आले होते़ या संदर्भातील करारनाम्यात एकूण २ कामे होती़ त्यात कारेगाव व शहापूर येथील सिमेंट नाला बांधाच्या २२ लाख ९४ हजार ९११ रुपयांच्या कामाचा समावेश होता़
या कामांची उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी तपासणी करून पंचनामा केला़ तसेच लातूर येथील वाप्कोस या संस्थेने मूल्यांकन केले असता, कामात अनियमिता आढळून आली, असा अहवाल दिला आहे़ त्यामुळे शासनाने निर्धारित करून दिलेल्या मानांकनाप्रमाणे काम केले नसून निर्धारित मानांकनाचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली़ त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद जेरुरकर यांनी दिली़ त्यावरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कुरेशी मोहम्मद फैय्याज अहमद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस करीत आहेत.
साडेगाव येथील कामांमध्येही अनियमितता
च्परभणी तालुक्यातील सोडगाव येथेही जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १ कोटी २० लाख रुपये खर्च करून ६ सिमेंट बंधाºयांची कामे करण्यात आली होती़ या बंधाºयाची कामेही निकृष्ट झाल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती़ त्यानुसार या कामांची वाप्कोस लि़ या संस्थेकडून तपासणी करण्यात आली़ त्यानंतर याबाबतचा अहवाल सदरील संस्थेने २१ जून रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे़
च्त्यामध्ये सिमेंट नाला बांध क्रमांक २ येथील सिमेंट बंधाºयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर क्युरिंग व्यवस्थित केली नसल्यामुळे दोन्ही बाजुंच्या भिंतीला वाळू व खडी उघडी दिसत आहे़ नाला पात्रामध्ये वाळू वाहून आल्यामुळे सिमेंट नाला बांधची अपेक्षित पाणी साठवण क्षमता मिळत नाही़ या बांधाच्या डाव्या संरक्षण भिंतीमध्ये भेगा पडल्या आहेत़ खोलीकरून टाकण्यात आलेल्या मातीचे संस्करण करण्यात आलेले नाही़ त्यामुळे माती नाला पत्रात पडत आहे़
च्सिमेंट नाला बांध क्रमांक ४, ५, ६ ची नाला खोलीकरणाची लांबी प्रस्तावित अंदाजपत्रकापेक्षा कमी करण्यात आलेली आहे़, असे अनेक अक्षेप या संस्थेने नोंदविले आहेत़ त्यामुळे येथील कामातही अनियमितता झाल्याचे दिसून आले आहे़ या प्रकरणी मात्र अद्याप प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही़

Web Title: Parbhani; The irregularities in 'Jalukta' work of Shahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.