परभणी : जलसाठ्याअभावी वाढल्या चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:23 AM2018-09-22T00:23:45+5:302018-09-22T00:24:46+5:30

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Parbhani: increased concern due to lack of storage | परभणी : जलसाठ्याअभावी वाढल्या चिंता

परभणी : जलसाठ्याअभावी वाढल्या चिंता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी परभणी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेती पिकांबरोबरच सिंचनाचा प्रश्नही उभा टाकला आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. प्रत्यक्षात केवळ ५९ टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये असमाधानकारक पाणीसाठा असल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत.
येलदरी, मासोळी, करपरा आणि निम्न दुधना हे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असून येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर परभणी जिल्ह्यासह शेजारच्या दोन जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४४ दलघमी एवढी असून त्यात २४२.२०० दलघमी उपयुक्त पाणीसाठा साठविला जाऊ शकतो. प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये केवळ ५९.७७० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. २४.६७ टक्के पाणी या प्रकल्पात आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रकल्पात ७०.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्के पाणीसाठा कमी असल्याने सेलू तालुक्यासह परभणी, मानवत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी निम्न दुधना प्रकल्पात मूबलक प्रमाणात पाणी असल्याने सेलू, परभणी, पूर्णा, मानवत या तालुक्यांना उन्हाळ्यात निम्न दुधना प्रकल्पातूनच पाणी उपलब्ध झाले होते. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढत नसल्याची स्थिती आहे. झरी प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. डिग्रस बंधाऱ्यामध्ये ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला तरी या बंधाºयातील पाणी नांदेडसाठी आरक्षित असल्याने डिग्रस बंधाºयातील पाणीसाठ्याचा जिल्ह्याला काहीही उपयोग होत नाही. पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाºयात ८० टक्के, ढालेगाव बंधाºयात ९६ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुुळी बंधाºयामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविली आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी पाऊस होत नाही. त्यामुळे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे; परंतु, सध्या तरी पाऊस हुलकावणी देत असून जिल्हावासियांच्या चिंता वाढत आहेत.
येलदरी प्रकल्पात ९.२४ टक्के साठा
जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. ९३४ दलघमी एवढी या प्रकल्पाची साठवण क्षमता असून त्यात ८०९.७७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पामध्ये १९९.४६९ दलघमी एकूण पाणीसाठा असून त्यामध्ये केवळ ७४.७९२ दलघमी (९.२४ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. येलदरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने धरणामध्ये अजूनही मूबलक पाणीसाठा जमा झाला नाही. परिणामी आगामी उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यासह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गंगाखेड तालुक्यात गंभीर स्थिती
गंगाखेड तालुक्याला मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळी बंधाºयातून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांमधून सिंचनासाठीही पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी दोन्ही प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नाही. मासोळी मध्यम प्रकल्पात ३४.०८५ दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामध्ये २७.१४१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा होऊ शकतो. प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये २.५८७ दलघमी (१० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मुळी बंधाºयाला गेट बसविले नसल्याने या बंधाºयातही पाणीसाठा जमा झाला नाही. सद्यस्थितीला बंधाºयामध्ये ०.८११ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ८ टक्के एवढी आहे.

Web Title: Parbhani: increased concern due to lack of storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.