परभणी : २५१३ लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:38 AM2018-10-20T00:38:31+5:302018-10-20T00:39:03+5:30

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जिल्ह्यातील २ हजार ५१३ घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. व्हिडिओ कॉन्स्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांशी संवाद साधण्याचे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही.

Parbhani: E-mortgage of 2513 beneficiaries | परभणी : २५१३ लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

परभणी : २५१३ लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जिल्ह्यातील २ हजार ५१३ घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. व्हिडिओ कॉन्स्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांशी संवाद साधण्याचे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षात तयार झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा शुक्रवारी शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिल्ह्यातील २ हजार ५१३ लाभार्थ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-गृहप्रवेश झाला. या योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात २ हजार १३१ घरकुलांची कामे पूर्ण झाली होती. तर २०१७-१८ या वर्षात ३५५ घरकुलांची कामे पूर्ण झाली. २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षात मात्र फक्त २७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्याला गेल्या ३ वर्षात ३ हजार ९७५ घरकुल बांधणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. ६ हजार ७९५ लाभार्थ्यांनी घरकुलांची मागणी केली. त्यापैकी ६ हजार २५२ लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या संभाव्य ठिकाणचे जिओ टॅगिंग करण्यात आले. मंजूर उद्दिष्टांपैकी ३ हजार ८१५ घरकुलाच्या टॅगिंगचे काम पूर्ण झाले. त्यापैकी अनुदानाचा निधी वितरित करण्यासाठी ३ हजार ७८९ लाभार्थ्यांच्या खात्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षात ३ हजार ७५७ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. तर २ हजार ८३४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्यात आला. २ हजार ३८२ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला . तर ६८९ लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला. आता मंजूर व जिओ टॅगिंग झालेल्या ३ हजार ८१५ लाभार्थ्यांपैकी २ हजार ५१३ लाभार्थ्यांचा ई-गृह प्रवेश झाला आहे. उर्वरित १ हजार ३०२ लाभार्थ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांशी झाला नाही लाभार्थ्यांचा संवाद
४प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शिर्डी येथे शुक्रवारी ई-गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला असला तरी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडक लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्सफरसिंगच्या माध्यमातून संवाद साधणार होते. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजेपासूनच कौसरबी पठाण, आशियाबी पठाण, शेख शाकेराबी, कुशावर्ता लोखंडे, लक्ष्मीबाई गायकवाड, अहमदबी युनूस खान पठाण, शेख शमीम शेख मुजमोद्दीन, प्रर्मिला काळे, वर्षा तायडे, शोभा काळे, ज्योती स्वामी, निर्मला स्वामी, चांगुणा चव्हाण, शांताबाई जाधव, यमुनाबाई दनकटवाड, चौत्राबाई शिंदे, करीम खान पठाण, रहीम खान पठाण, सुरेखा जडे, निर्मला गवळी हे लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसी रुममध्ये बसून होते. त्यांना पंतप्रधानांसोबत चर्चा करीत असताना काय बोलायचे याची अधिकाऱ्यांनी अगोदरच माहिती दिली होती; परंतु, पंतप्रधानांना वेळ मिळाला नसल्याने या लाभार्थ्यांचा त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. विशेष म्हणजे यापूर्वीही एकदा याच योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधणार होते; परंतु, त्यावेळीही संवादाचा कार्यक्रम झाला नव्हता.
जिंतूर तालुक्यात सर्वाधिक घरकुले
४ई-गृहप्रवेश सोहळ्याअंतर्गत ज्या २ हजार ५१३ लाभार्थ्यांचा गृहप्रवेश झाला. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ लाभार्थी जिंतूर तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल परभणी तालुक्यात ३७२, गंगाखेड तालुक्यात ३१०, पालम तालुक्यात ३१५, पाथरी तालुक्यात ३२५, सेलू तालुक्यात २०३, मानवत तालुक्यात १६३ आणि सोनपेठ तालुक्यात १४६ लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत एका लाभार्थ्याला शासनाकडून प्रति लाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान घरकुल बांधणीसाठी दिले जाते. सदरील लाभार्थ्यांने घरकुल बांधकामासाठी नरेगा अंतर्गत स्वत: काम केले असेल तर त्याला १८ हजार रुपयांची मजुरी दिली जाते व स्वच्छता अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केल्यास त्याला १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

Web Title: Parbhani: E-mortgage of 2513 beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.