Parbhani: Check out the liquor shops in the educational town | परभणी: शैक्षणिक नगरीला मद्य विक्री दुकानांचा विळखा
परभणी: शैक्षणिक नगरीला मद्य विक्री दुकानांचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या नवलौकिक असलेले सेलू शहर चोहूबाजूने मद्य दुकानांच्या विळख्यात सापडले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक परवानाधारक परमीट रूम व इतर दारुंची दुकाने शहरात असल्याने दररोज शेकडो लिटर दारुची विक्री होत आहे.
मराठवाड्यातील पुणे म्हणून शहराची काही वर्षापूर्वी ओळख होती. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था तसेच सामाजिक चळवळीचे अनेक वर्षे सेलू हे केंद्र राहिलेले आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिग्गज कलाकारांनी व्यासपीठ गाजविलेले आहे. नाट्य परंपरेचा मोठा वारसा शहराला लाभलेला आहे; परंतु, अलिकडच्या काळात बीअरबारची झपाट्याने वाढलेली संख्या चिंतेचा विषय बनला आहे. शहरात शैक्षणिक वातावरण असल्याने जिल्ह्यातील विविध शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे वास्तव्य आहे. त्यामुळेच चारही बाजूंनी शहराचा विस्तार वाढत गेला आहे. त्यातच नोकरदार वर्ग, शहरात राहण्यासाठी सेलूला पसंती देतात. मात्र वाढत्या विस्तारासोबतच परमीट रुमची संख्या पाहता सेलूने इतर शहराला दारूच्या दुकानाच्या बाबतीत मागे सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात एफएल-३ चे २० परवानाधारक परमीट रुम आहेत. तसेच देशी दारुचे ३ परवानाधारक दुकाने असूून, ४ बीअरशॉपी तर १ वॉईन शॉप आहे. या परवानाधारक दारूच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत आहे. काही परमीट रुममध्ये दारूच्या भावात तफावत असल्याची माहिती आहे. काही परमीट रुममध्ये कमी दराने काही मध्ये दारूचा भाव अधिक असल्याचे समजते.
दरम्यान, देशी दारूच्या दुकानातून बॉक्सचे बॉक्स ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्री करणारी मंडळी छुप्या मार्गाने नेत असतात. संबंधित विभागातील अधिकारी ठरल्याप्रमाणे केवळ कागदपत्रे तपासणी करून पुढे निघतात. परमीट रुमपेक्षा कमी दरात वॉईनशॉपवर दारू मिळत असल्याने सायंकाळी या दुकानांसमोर चांगलीच गर्दी असते. येथून दारू घेऊन रात्रीच्या वेळी शहरातील मोकळ्या मैदानातच कमी खर्चात मद्यपीच्या पार्ट्या रंगतात. काही दिवसात आणखी परमीट रूमची संख्या वाढली तर आश्यर्च वाटायला नको, अशी परिस्थिती शहरात दिसत आहे.
चोहू बाजूने विळखा
सेलू शहराच्या चोहू बाजुुंनी मद्यांच्या दुकानाचा विळखा आहे. सेलू ते सातोना रोड, सेलू-परभणी, सेलू- देवगावफाटा तसेच सेलू-पाथरी या रस्त्यावर परमीट रुमची संख्या अधिक आहे. तसेच रायगड कॉर्नर ते रेल्वेस्थानक या मुख्य रस्त्यावरही दुकानांची मोठी रेलचेल आहे.


Web Title: Parbhani: Check out the liquor shops in the educational town
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.